scorecardresearch

अर्थव्यवस्था भक्कम करण्यावर भर!; अजित पवार यांचे प्रतिपादन; ‘जीएसटी’ भवनाचे भूमिपूजन

राज्य विक्रीकर विभागाने करसंकलनातून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच करोनाविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकली.

मुंबई : राज्य विक्रीकर विभागाने करसंकलनातून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच करोनाविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकली. महाराष्ट्र हे औद्योगिक व व्यापारीदृष्टय़ा, देशातले सर्वाधिक विकसित राज्य असून देशाला जीएसटीद्वारे सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जमा होतो. आजमितीस देशाच्या एकूण जीएसटी वसुलीत महाराष्ट्राचा वाटा १४.७० टक्के आहे.

राज्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देत असतानाच, कर आकारणीसंदर्भातही मध्यममार्ग शोधला आहे. करआकारणीत संतुलन साधण्याचा, त्यातून कर उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार  यांनी शनिवारी सांगितले.

  सरकारचे नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे. वस्तू व सेवा कर भवनच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय पवार यांना आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण आज चोख उत्तर  दिले आहे. आमच्यात कुठलेही भेदभाव नाहीत हे दाखवून दिले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या स्थैर्याचा दावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाले.  महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुनावले.

गुन्हेगारांवर वचक

११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनसह गृहविभागाच्या सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी या वेळी उपस्थित होते. ११२ क्रमांक फिरवला की गुन्हेगारांचे बारा वाजलेच पाहिजे. दोन वर्षे आपण करोनाचा मुकाबला केला. तसा आता हा सायबर क्राइमचा विषाणूही मोठा होतो आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. सरकार मजबुतीने पोलिसांच्या पाठीशी आहे. काही जणांना चांगली कामे पाहवत नाहीत. पोलिसांना माफिया वगैरे म्हणत त्यांची बदनामी करतात. पण मला पोलिसांचा अभिमान आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Emphasis strengthening economy ajit pawar statement bhumi pujan gst building ysh

ताज्या बातम्या