मुंबई : Dead Rats Found In CSMT Premises गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील दालने, कार्यालये येथे मृत उंदीर आढळत असून त्यामुळे मोटरमन, लोकल व्यवस्थापक व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मृत उंदरामुळे रोगराई पसरण्याची धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यातील दोन मृत उंदरांची तपासणी पशु वैद्यकीय रुग्णालयात होणार आहे. दरम्यान, कर्मचारी दालनात मृत उंदरांची दुर्गंधी पसरल्याने, मोटरमन, लोकल व्यवस्थापक दालनाबाहेर बसत आहेत, तर आता स्थानक व्यवस्थापक, उद्घोषक व इतर काही रेल्वे कर्मचाऱ्यांनाही फलाटावर बसून काम करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीएसएमटी येथे मोटरमन, लोकल व्यवस्थापकांच्या दालनात आणि इतर कार्यालयातील कृत्रिम छतावर, शौचालयाच्या परिसरातून मृत उंदीर आढळून आले. जिवंत उंदरांचा सुळसुळाटही ऐतिहासिक इमारतीत वाढला आहे. संपूर्ण स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना स्थानकावर पाच मिनिटे उभे राहणेही जिकिरीचे झाले आहे. उंदरांच्या मरण्याचे कारण जाणून घेण्यासाठी दोन मृत उंदीर प्लास्टिक पिशवीत बंद करुन, आवश्यक चाचणीसाठी परळ येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हेही वाचा >>> Sion Bridge Demolition : शीव उड्डाणपूल बंद झाल्यास, पालक-विद्यार्थ्यांची धावपळ रोगराईचा धोका उंदराची लाळ, विष्ठा आणि मूत्रापासून रोगराई पसरण्याची शक्यता असते. मूत्र किंंवा विष्ठा पाण्याद्वारे मानवाच्या संपर्कात आल्यास मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सीएसएमटी येथे कोणत्या रोगामुळे उंदीर मेले आहेत का, त्याचा काही धोका आहे का हे पशूवैद्यकीय रुग्णालयाचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर स्पष्ट होईल, असे जे.जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हेही वाचा >>> नवीन महाबळेश्वरमध्ये दुर्गम भागात पोहोचण्यासाठी रोप वेचा पर्याय, विकास आराखड्यात रोप वे प्रस्तावित कर्मचारी फलाटावर. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरून दररोज सुमारे ११ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी स्थानकात प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. इच्छित लोकलची वाट पाहण्यासाठी संपूर्ण सीएसएमटी परिसरात प्रवासी उभे असतात. मात्र, आता मोटरमन, लोकल व्यवस्थापक, स्थानक व्यवस्थापक, उद्घोषक सीएसएमटी फलाटावर आल्याने, प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जागेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळवेळी दाटीवाटी होते आहे. कर्मचारी दालनातील मृत उंदीर शोधण्यासाठी आणि ठिकाण निर्जंतुक करण्यासाठी दोन अल्ट्रा मार्डन बोरोस्कोपिक कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना बसण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उग्र दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात करून साफसफाई केली जात आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोटरमन वर्गात नाराजी मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना बसण्यास रेल्वे प्रशासनाने योग्य जागा उपलब्ध करून न दिल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. उंदरांमुळे कर्मचारी दालनाची तोडफोड करण्यात आली आहे. दालनाच्या नूतनीकरणास एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे, असे एका मोटरमनने सांगितले. मोटरमनच्या दालनाला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव व इतर वरिष्ठ अधिकारी भेटी देत आहेत. मात्र, मृत उंदरांमुळे मोटरमनसह इतर कर्मचाऱ्यांना दालनाबाहेर बसावे लागत आहे. मोटरमनला तणावमुक्त होण्यासाठी आरामाची आवश्यकता असते. परंतु, दालनाबाहेर अडचणीच्या ठिकाणी बसावे लागत आहे. तसेच मोटरमनचे सामानही बाहेर ठेवले आहे. जर १ ऑगस्टपर्यंत योग्यप्रकारे व्यवस्था न केल्यास, मोटरमनाच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष विवेक सिसोदिया यांनी सांगितले.