scorecardresearch

निर्बंधांमुळे कार्यालयाजवळ घराचा शोध

तिसरी लाट ओसरू लागल्यामुळे आता पुन्हा एकदा कार्यालयातून काम सुरू करण्याचा विचार अनेक कंपन्या करत आहेत.

मुंबई : सततचे निर्बंध, करोनाच्या लाटा आणि त्यामुळे कार्यशैलीतील सातत्याने करावे लागणारे बदल, प्रवासाची भीती यामुळे सगळय़ा परिस्थितीत कार्यालयाच्या जवळ घर घेण्याकडे कल वाढू लागला आहे. मागील वर्षी सरत्या तिमाहीत बहुतेक कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा रद्द करून प्रत्यक्ष कार्यालयातून काम करण्याच्या सूचना दिल्यामुळे कामाच्या ठिकाणाजवळच राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

सध्या मुंबईतील तिसरी लाट ओसरू लागल्यामुळे आता पुन्हा एकदा कार्यालयातून काम सुरू करण्याचा विचार अनेक कंपन्या करत आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ, शीण टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाजवळ घराचा शोध सुरू केला.

अनेक मोठय़ा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ३६५ दिवस घरून काम करण्याचा पर्याय लागू केला आहे ज्यात ‘ट्विटर’, ‘मेटा’सह ‘टाटा स्टिल’ या कंपन्यांची नावे आहेत. त्यातूून सध्या अनेक कंपन्या खासकरून आयटी कंपन्या सध्या हायब्रीड स्वरूपात कार्यरत आहेत त्यामुळे कार्यशीलता राखण्यासाठी म्हणून आणि कार्यालयाशीही संपर्क राहावा याकरिता कार्यालयाच्या नजीक राहण्यासाठी कर्मचारी गृहशोध करताना दिसतात.

छोटेखानी कार्यालयांचा पर्याय कर्मचाऱ्यांच्या घराच्या जवळच कार्यालये असावीत या उद्देशाने छोटेखानी कार्यालये सुरू करण्याचा विचार पुढे येतो आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळील शाखेत स्थलांतरित करण्याचा पर्यायही काही कंपन्यांच्या विचाराधीन आहे. वेगवेगळय़ा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामासाठी जागा भाडय़ाने घेण्याकडेही ओघ वाढला असल्याचे निरीक्षण ‘जेएलएल’ तसेच अन्य काही स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणातून मांडले आहे. 

२०२१ च्या शेवटापर्यंत किंबहुना अगदी आत्तापर्यंत स्थावर मालमत्तेच्या खरेदीत ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई महानगरात गृहखरेदी वेगाने झाली आहे. या दरम्यान ३ बीएचकेची मागणी गेल्यावर्षी २९ टक्के होती ती आता ३३ टक्के झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ८० टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणानजीक राहण्याचा पर्याय निवडला आहे. ७८ टक्के ग्राहक आपापल्या शहरांमध्येच घर खरेदी करण्याचा पर्याय शोधत आहेत. तसेच रेडी टू मूव्ह घरांची मागणी अद्यापही मोठी आहे. सध्या घरविक्रेत्यांनी दिलेल्या सवलतींचा फायदाही अनेकांना होतो आहे.      – सौरभ गर्ग, सह-संस्थापक, नोब्रोकर डॉट कॉम

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Employees search home close to the workplace zws

ताज्या बातम्या