मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी (बीई-बी.टेक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत तब्बल ८८,०४८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, त्यापैकी ८,१२८ विद्यार्थ्यांना प्रथमच महाविद्यालय मिळाले आहे.
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी राज्यात एकूण २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी १ लाख ८१ हजार २८३ विद्यार्थ्यांना चार फेऱ्यांमध्ये जागावाटप झाले आहे. यात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत ९३,२३५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले. यामुळे ८८,०४८ जागा चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असून २२ हजार १० जागा रिक्त आहेत.
या जागा व चौथ्या फेरीमध्ये प्रवेश न होणाऱ्या जागा या संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध असतील. चौथ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान संबंधित महाविद्यालयांत प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान संस्थात्मक फेरीचे प्रवेश होणार आहेत.
६०,८९३ विद्यार्थ्यांना ‘बेटरमेंट’ नाही
तिसऱ्या फेरीनंतर महाविद्यालय बदलण्यासाठी अर्थात ‘सुधारणे’चा पर्याय स्वीकारून चौथ्या फेरीत सहभागी झालेल्या ६०,८९३ विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या पसंतीक्रमात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत मिळालेले महाविद्यालयच पुन्हा देण्यात आले. दरम्यान, चौथ्या फेरीतील जागावाटपामुळे प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा आता संस्थास्तरीय फेरीकडे वळणार आहे.
