मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी (बीई/बीटेक) प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या १ लाख ५७ हजार १०३ पैकी फक्त ३१ हजार ९७७ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले. तर २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अधिक चांगले महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम मिळवण्यासाठी ‘सुधारणा’चा पर्याय स्वीकारला. त्यामुळे दुसऱ्या फेरीत मोठ्या प्रमाणावर जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असून, १२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील ३६७ संस्थांमध्ये १ लाख ७५ हजार ५८५ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी २ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली. यातील १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करायचे होते. या कालावधीत फक्त ३१ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

पहिल्या पसंतीऐवजी इतर महाविद्यालय किंवा अभ्यासक्रम मिळालेल्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न करता ‘सुधारणा’चा पर्याय स्वीकारला. त्यामुळे दुसऱ्या फेरीत त्यांना अधिक पसंतीचे महाविद्यालय किंवा शाखा मिळण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. तसेच पहिल्या फेरीत संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे.