मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी पदवी (बीई, बीटेक), व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला २ जुलैपासून सुरुवात करण्यात आली. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्जनोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर १५ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी, तर २० जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणीनंतर ३ ते १३ जुलैदरम्यान कागदपत्रे पडताळणी करून अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर १५ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलैदरम्यान हरकती आणि दुरुस्त्या नोंदविता येणार आहेत. दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर केली जाईल. जागावाटपाचे स्वतंत्र वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. ई-स्क्रुटिनीद्वारे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइनच पडताळणी होणार आहे. प्रत्यक्ष पडताळणीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
एमएचटी-सीईटीमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र जेईई (मुख्य) किंवा नीटच्या गुणांच्या आधारे अर्ज करणाऱ्या आणि एमएचटी-सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागेल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे शुल्क १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी १,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
एमबीए आणि एमएमएस प्रवेशासाठी एमएएच-एमबीए, एमएमएस-सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. मात्र कॅट, सीमॅट, एक्सएटी, एटीएमए, मॅट किंवा जीमॅट गुणांच्या आधारे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी १,५०० रुपये, तर राखीव प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी १,३०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
