मुंबई: अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेबरोबर (सीईटी) बारावीच्या परीक्षेतील गुणांनाही महत्त्व देण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटीतील पर्सेंटाइल आणि बारावीच्या गुणांची टक्केवारी यांचा विचार करून गुणवत्ता यादी निश्चित करण्याचे धोरण ठरविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीला १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये चांगले पर्सेंटाईल मिळाले तरी बारावीच्या परीक्षेत त्यांनी केवळ पात्रतेसाठी आवश्यक गुण मिळालेले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो त्याचबरोबर बारावीच्या परीक्षेचे महत्वही कमी झाले आहे. औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार प्रवेशाचे नवे धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरूवारी (१७ सप्टेंबर) घेण्यात आला आहे.
बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा विचार करून बारावीच्या परीक्षेतील शैक्षणिक कामगिरी आणि एमएचटी-सीईटीतील कामगिरी या दोन्ही घटकांना योग्य प्रमाणात महत्त्व देण्याची शिफारस समिती करणार आहे. बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल यांचे प्रमाण निश्चित करण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधता येईल आणि गुणवत्ता यादी अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ व सर्व उमेदवारांसाठी समतोल राहील, यासाठी प्रवेश प्रक्रियेतील गुणांकन पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे.
समितीतील सदस्य
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे (महासार्क) अध्यक्ष समितीचे अध्यक्ष असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांचे कुलगुरू सदस्य असतील. उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य, तर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. आवश्यकतेनुसार संबंधित विषयतज्ज्ञांना बैठकीसाठी बोलावण्याचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.
नवे धोरण कधीपासून?
बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल यांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा सकारात्मक विचार झाल्यास, त्याची अंमलबजावणी कधीपासून करता येईल, याबाबतही समिती शिफारस करणार आहे. बारावीची परीक्षा आणि सीईटीची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी मिळेल, याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ निश्चित करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे आगामी प्रवेश प्रक्रियेत या निकषांचा समावेश होणार की पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल लागू होतील, हे समितीच्या शिफारशी आणि शासनाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल.
