मुंबई : म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांना पात्रता निश्चितीपासून ते घराचा ताबा मिळविण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी म्हाडा कार्यालय आणि संबंधित बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता लवकरच विजेत्यांचा हा त्रास दूर होणार आहे. आता सोडतीसह त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम सूचना पत्रापासून देकारपत्रार्पयचे वितरण आणि त्यानंतर घराची रक्कम भरून त्याचा ताबा देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. यासंबंधीचे काम वेगात सुरू असून लवकरच यासाठीची संगणकीय प्रणाली कार्यान्वित होणार आहे.  त्यामुळे विजेत्यांना केवळ प्रत्यक्ष घराचा ताबा घेण्यासाठीच म्हाडात यावे लागण्याची शक्यता आहे.

म्हाडाने काही वर्षांपूर्वी ऑनलाइन सोडत काढण्यास सुरुवात करून पारदर्शकता आणली. सोडतीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली. सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया मात्र अद्याप ऑनलाइन पद्धतीने होत नाही. त्यामुळे प्रथम सूचनापत्र घेण्यासाठी अनेकदा विजेत्यांना बँकेत जावे लागते. कागदपत्रे जमा करण्यासाठीही बँकेत धाव घ्यावी लागते. त्यानंतरही अनेक कामासाठी, पात्रता निश्चितीसाठी, देकारपत्र घेण्यासाठी बँकेत आणि म्हाडाच्या कार्यलयात जावे लागते. मात्र यापुढे लवकरच विजेत्यांच्या या फेऱ्या बंद होणार आहेत. सोडतीपूर्व आणि सोडतीनंतरचीही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे फार कमी वेळा वा केवळ घराचा ताबा घेण्यासाठीच विजेत्यांना म्हाडाच्या कार्यलयात यावे लागेल, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

म्हाडाच्या सर्वसाधारण सोडतीसह गिरणी कामगारांची सोडती व नंतरची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे काम म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.

देकारपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध

संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाल्यास विजेत्यांना प्रथम सूचनापत्र असो वा देकारपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. त्यानुसार पुढील सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करून विजेत्यांना केवळ घराचा ताबा घेण्यासाठीच म्हाडात यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब म्हाडा विजेत्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तसेच यामुळे सोडत प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entire process of mhada after lottery is also online zws
First published on: 19-05-2022 at 02:11 IST