पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरांमधील प्रतवारी उत्तम
दिवाळीच्या फटाक्यांचा धूर विरून गेल्यानंतर मुंबईच्या हवेची प्रतवारी पुन्हा सुधारली आहे. त्यातही पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरांमधील हवा अधिक चांगली असल्याचे ‘सफर’ संकेतस्थळावरील नोंदीतून दिसून येत आहे. कुलाबा आणि बोरिवली येथील हवेच्या सर्वच प्रदूषकांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या आत आहे. इतर केंद्रांवर मात्र सूक्ष्म कण तसेच नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण काही वेळा जास्त झाल्याचे दिसते.
उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने सफर प्रकल्पाअंतर्गत शहरातील नऊ ठिकाणी हवेची प्रतवारी तसेच हवामान नोंदवण्याचे केंद्र सुरू केले आहे.सूक्ष्म धूलिकण, नायट्रोजन डायऑक्साइड्स, कार्बन मोनॉक्साइड आणि ओझोनचे प्रमाण मोजून हवेची शुद्धता तपासली जाते. या प्रदूषकांच्या प्रमाणानुसार हवेची उत्तम, समाधानकारक, खराब, गंभीर व धोकादायक अशी प्रतवारी केली जाते.
पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे शहरातील हवेची प्रतवारी चांगली राहिली होती. मात्र पावसाळा संपल्यानंतर वाऱ्याचा वेगही ओसरल्याने शहरातील प्रदूषकांचे प्रमाण वाढून हवेची पातळी खराब झाली होती. त्यातच दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रतवारी आणखी घसरली. मात्र दिवाळीनंतर फटाके बंद झाल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांना शुद्ध हवेत श्वास घ्यायला मिळत आहे. ईशान्येकडून तसेच काही वेळा नैर्ऋत्येकडून आलेल्या वाऱ्यांमुळेही मुंबईची हवा शुद्ध राहण्यास मदत होते.

’नऊ केंद्रांपैकी कुलाबा आणि बोरिवली येथे सर्वच प्रदूषण मर्यादित पातळीच्या आत
’पश्चिम उपनगरांमधील मालाड, अंधेरी, वांद्रे- कुर्ला संकुल आणि वरळी येथे सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असले तरी समाधानकारक पातळीच्या आत
’भांडुप, चेंबूर आणि माझगाव येथे सूक्ष्म कणांसोबतच नायट्रोजन डाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक असल्याने हवेची प्रतवारी खराब