मुंबई : मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील पहिल्या गाडीचे डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यासाठी सोमवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) आरेतील रस्त्यावरील झाडांची बेकायदा छाटणी केल्याचा आरोप आरे संवर्धन गटाने केला. वृक्षछाटणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय पर्यावरणप्रेमींनी घेतला असून, आज, मंगळवारी याचिका दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशातून मेट्रोचे दोन डबे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुढील आठवडय़ापासून डबे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. हे डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यासाठी आरेत मुंबई पालिकेची परवानगी घेऊन सोमवारी सकाळी वृक्षछाटणी सुरू करण्यात आली. त्यासाठी आरेत जाणारे रस्ते बंद करण्यात आले, बेस्ट वाहतूक वळविण्यात आली तसेच मोठय़ा संख्येने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. ‘एमएमआरसी’ आणि पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर पर्यावरणप्रेमींनी संशय व्यक्त करून वृक्षछाटणीला विरोध केला. दुपारपासून आरेत तणावाची स्थिती होती़  रात्री उशिरापर्यंत आरेत तणाव होता. रात्री साडेआठनंतर पोलिसांनी चारही जणांची सुटका केली.

‘एमएमआरसी’ने वृक्षछाटणीच्या नावाखाली आरेतील झाडे कापली आहेत. त्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही हा प्रकार घडला़  याविरोधात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.  – स्टॅलिन दयानंद, प्रकल्प संचालक, वनशक्ती