मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाने शेअर बाजारात अस्थिरता निर्माण केली असताना, सरलेल्या एप्रिलमध्ये समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वार्षिक तुलनेत ३.२४ टक्क्यांनी घसरून २४,२६९ कोटी रुपयांपर्यंत रोडावली आहे.

गत वर्षभरातील हा सर्वात कमी ओघ असून, इक्विटी फंडातील गुंतवणुकीत घसरणीचा हा सलग चौथा महिना आहे. तथापि गुंतवणूक घटली असली तरी या विभागात निव्वळ गुंतवणूक सकारात्मक राहण्याचा सलग ५० वा महिना देखील आहे.

इक्विटी फंडातील नवीन गुंतवणूक मंदावली असली तरी देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) एप्रिलमध्ये विक्रमी ७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्चअखेर राहिलेल्या ६५.७४ लाख कोटी रुपयांवरून ते वाढले आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘अॅम्फी’ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

विशेषत: रोखेसंलग्न अर्थात डेट फंडांमध्ये एप्रिल महिन्यांतील २.१९ लाख कोटी रुपयांचा निव्वळ ओघ हा उपकारक ठरला. मार्चमध्ये डेट फंडांतून २.०२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती.

इक्विटी फंडांच्या श्रेणींमध्ये, फ्लेक्सी कॅप फंडात एप्रिलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक नोंदविली गेली. या वर्गवारीने ५,५४२ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. तथापि, करबचतीचे साधन असलेल्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग (ईएलएसएस) योजनांमधून ३७२ कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांनीही एप्रिलमध्ये गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. या वर्गवारीत अनुक्रमे ३,३१४ कोटी आणि ४,००० कोटी रुपयांचा निधी आला. लार्ज-कॅप फंडांमध्ये मार्चमधील २,४७९ कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिलमध्ये २,६७१ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आली.