स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात आंदोलन छेडणाऱ्या व्यापाऱ्यांना उघड पाठिंबा देणाऱ्या शिवेसेना- भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या महापालिकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. गुरुवारी झालेल्या महापौर परिषदेत एलबीटीचे जोरदार समर्थन करीत सर्वच महापौरांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला.त्यामुळे एलबीटीवरील या पक्षांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.
एलबीटीच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे चित्र दिसत असतानाच गुरुवारी राज्यातील महापौर त्यांच्या मदतीला धावून आले. राज्यातील महापौर परिषदेच्या बैठकीत एलबीटीचे जोरदार समर्थन करण्यात आले.
मुंबईचे महापौर सुनील प्रभू हे या परिषदेचे अध्यक्ष असून ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील सरचिटणीस आणि नवी मुंबईचे महापौर सागर नाईक कार्यकारी अध्यक्ष आहेत.
गुरुवारच्या बैठकीस औरंगाबादचे महापौर कला रविनंदन ओझा, सांगलीचे महापौर इद्रीस नायकवाडी लातूरच्या महापौर स्मिता खानापुरे यांच्यासह राज्यातील महापौर आणि महापौर परिषदेचे संयोजक रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.