मुंबई: कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) माध्यमातून विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधा, विमा लाभ आणि विविध सेवांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी क्यूआर कोडसह माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिजिटल सुविधांमुळे विमाधारकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल आणि ईएसआयसीच्या विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे ठरेल, असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.

ईएसआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने विकसित केलेल्या क्यूआर कोडमध्ये महामंडळाच्या विविध लाभांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये विमाधारक कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ, कर्मचारी आणि नियोक्त्यांसाठी मार्गदर्शिका, शाखा कार्यालये, डीसीबीओ, दवाखाने, कर्मचारी राज्य विमा रुग्णालये, विमा वैद्यकीय व्यवसायी (आयएमपी) तसेच संलग्न रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेमुळे विमाधारकांना संबंधित कार्यालये आणि आरोग्य संस्थांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, संबंधित दवाखाने किंवा रुग्णालयांची माहिती कुठे मिळेल आणि कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोणते लाभ लागू आहेत, यासंबंधी माहिती मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

रुग्णालयांमधून माहिती पुस्तिकांचे वितरण

डिजिटल माध्यमांसोबतच पारंपरिक माहिती प्रसाराच्या पद्धतीचाही वापर करण्यात येणार आहे. ईएसआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने विमाधारकांना विविध लाभ आणि सेवांची माहिती देण्यासाठी माहिती, शिक्षण व संवादविषयक पुस्तिका मुद्रित केल्या आहेत. या पुस्तिकांचे वितरण कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालयांमधून करण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या विमाधारकांना या पुस्तिकांच्या माध्यमातून ईएसआयसीच्या उपलब्ध सेवा आणि सुविधांची माहिती मिळू शकेल. डिजिटल सुविधा वापरण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांसाठीही माहिती पुस्तिका उपयुक्त ठरणार आहेत. क्यूआर कोड आणि छापील माहिती पुस्तिका अशा दोन्ही माध्यमांतून माहितीचा प्रसार केल्यामुळे अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

क्यूआर कोडचा वापर केवळ मुंबईपुरता मर्यादित न ठेवता त्याचा व्यापक प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी हा क्यूआर कोड सर्व क्षेत्रीय कार्यालये, महाराष्ट्र ईएसआय सोसायटी तसेच नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून संबंधित कार्यालये आणि प्रतिनिधींकडून विमाधारकांपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.

४५ लाखांहून अधिक विमाधारक

विमाधारकांपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने संपर्क तपशीलांची उपलब्धताही महत्त्वाची आहे. डेटा सामायिकरण करारानंतर १२ जुलै २०२६ रोजीच्या नोंदीनुसार ४५ लाख ३४ हजार ७३७ विमाधारकांच्या निवासी पत्त्यांची आणि मोबाईल क्रमांकांची माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती ईएसआयसीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने महाराष्ट्र ईएसआय सोसायटीला उपलब्ध करून दिली आहे.