लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील शेवटच्या सत्र परीक्षांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे. पाच लाखांपैकी साडेचार लाख उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून आतापर्यंत उन्हाळी सत्रातील ४४ परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर केल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

महत्वाच्या सर्व परीक्षांचे निकाल हे वेळेवर जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्न महाविद्यालये, परीक्षा विभागातील विविध विभागांशी योग्य समन्वय साधल्यामुळे सर्व परीक्षांचे ८० टक्के मूल्यांकन पूर्ण झाले असून सर्व परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळून त्यांच्या उच्च शिक्षणाचा आणि नोकरीचा मार्ग मोकळा होणार आहे.

आणखी वाचा- मुंबई: परिसरातील कचऱ्याची आजपासून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर तक्रार करता येणार

बी.कॉमच्या सहाव्या सत्राचे ९८ टक्के मूल्यांकन पूर्ण

मुंबई विद्यापीठात पदवी स्तरावर वाणिज्य शाखेत (बी. कॉम) सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेस तब्बल ६३ हजार विद्यार्थी बसलेले आहेत. बी. कॉम सत्र ६ चे ९८ टक्के, बी.एम.एस सत्र ६ चे ७५ टक्के, कला शाखेचे ८० टक्के, विज्ञान शाखेचे ८५ टक्के आणि अभियांत्रिकी शाखेचे ९० टक्के मूल्यांकन पूर्ण झाले आहे. यामुळे बी.कॉम सत्र ६, बी.ए सत्र ६ , बी.एस्सी सत्र ६, बी.एम.एस सत्र ६ आणि अभियांत्रिकी सत्र ८ या अंतिम वर्षातील शेवटच्या सत्र परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evaluation of mumbai university exams in final phase mumbai print news mrj
First published on: 05-06-2023 at 21:57 IST