मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरून तातडीने बेस्ट बस सुरू करा, अशी मागणी भाजपचे विलेपार्ले येथील माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केली आहे. त्यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवून ही मागणी केली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल रविवार, ११ मे रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. आता या पुलावरून बेस्टच्या बसगाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवून हे बसमार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गोखले पुलावरून ४२४, ४४४, ३५९, २२५, १८०, २९०, ३२४, ३२८, ३३०, ३३६, ४२२,४२५ हे बसमार्ग धावत होते. मात्र गेली सात वर्षे हा पूल बंद असल्यामुळे हे बसमार्ग खंडीत करण्यात आले होते. तर काही बसमार्ग वळवण्यात आले होते. आता पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली असून हे बसमार्ग पुन्हा एकदा सुरू करावे, अशी मागणी सामंत यांनी केली आहे. या बससेवेमुळे अंधेरी, विलेपार्ले पूर्व व पश्चिमकडील नागरिकांना मुलुंड, कुर्ला, शीव, नवी मुंबई, ओशिवरा, वर्सोवा, मालवणी, वांद्रे पश्चिम आदी सर्वदूर पोहोचण्याचे साधन उपलब्ध होईल, असेही सामंत यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच बेस्ट उपक्रमातील संबंधित अधिकाऱ्यांना गोखले पुलावरील बस वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच बसमार्ग सुरू करताना गोखले पुलाजवळच्या जुन्या बसस्थानकांचे नूतनीकरण करावे, छत तयार करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोखले पुलाची एक बाजू गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र तरीही बसगाड्या या पुलावरून जात नव्हत्या. वाहतूक विभागाने या पुलावर उंची अटकाव लावले होते. तसेच पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या गर्डरचे आडवे खांब पुलावर आले असल्यामुळे अवजड वाहने, बसगाड्या, शालेय बस पुलावरू जाऊ शकत नव्हत्या. मात्र आता पूल सुरू झाल्यानंतर हे सगळे उंची अटकाव (हाईट बॅरिअर) हटवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या पुलावरून वाहने पुढे पश्चिम द्रूतगती मार्गावर जातात. तिथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पश्चिम द्रुतगती मार्ग आणि गोखले पूलादरम्यान उंची अटकाव लावण्यात आले होते. तेही आता हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे मार्ग सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.