पुन्हा ठाणे कारागृह मिळवण्यासाठी धडपड

मुंबई : उद्योगपती मुके श अंबानी धमकी, व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक के लेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विशेष न्यायालयाने सोमवारी १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जिवाची भीती असल्याने तळोजाऐवजी ठाणे कारागृहातच ठेवावे, अशी विनंती शर्मा यांनी न्यायालयात के ली. न्यायालयाने शर्मा यांच्या विनंतीवर कारागृह विभागास निर्णय घेण्याची सूचना के ली.

एनआयएने शर्मा यांना १७ जूनला अटक करत दोन्ही गुन्ह्य़ांत त्यांचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याचा दावा के ला. प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच मुख्य आरोपी सचिन वाझे यांना पुरावे नष्ट करण्यासाठी मदत के ली, असेही न्यायालयाला सांगितले. या प्रकरणांत तपास करता यावा यासाठी न्यायालयाने शर्मा यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ती मुदत सोमवारी संपली. एनआयएने शर्मा यांच्या अतिरिक्त कोठडी न मागितल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शर्मा यांचे वकील अ‍ॅड. सुदीप पासबोला यांनी शर्मा यांना तळोजाऐवजी ठाणे कारागृहात ठेवण्याचे आदेश द्यावेत, असा विनंती अर्ज सादर के ला.

अनेक गंभीर, गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास के ल्याने त्यांच्या जिवाला धोका आहे. शर्मा पोलीस दलात असतानाही त्यांना संरक्षण देण्यात आले होते, असा युक्तिवाद अ‍ॅड. पासबोला यांनी के ला. एनआयएने त्यास विरोध न करता हा विषय कारागृह विभागाच्या अखत्यारीत येतो, असे स्पष्ट के ले. न्यायालयानेही कारागृह विभागास शर्मा यांच्या अर्जाबाबत निर्णय घेण्याची सूचना के ली.

याआधी बहुचर्चित लखनभैया हत्याकांड प्रकरणात शर्मा सुमारे चार वर्षे अटके त होते. तेव्हाही त्यांना ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीचा बहुतांश काळ त्यांनी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काढला होता. या प्रकरणातून निदरेष सुटल्यावर त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. मात्र पोलीस दलाचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवली.

एका प्रचार सभेत शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच रुग्णालयातील वास्तव्य शक्य झाले, असे जाहीर के ले. त्यावरून वाद निर्माण होताच शर्मा यांना सारवासारव करावी लागली होती. दरम्यान, अंबानी-मनसुख प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासह इतर न्यायालयीन कोठडीत असून त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.