मुंबई : शंभर टक्के नालेसफाईचा दावा पालिका प्रशासनाने केलेला असला तरी प्रत्यक्षात नाले अद्याप गाळाने भरलेले असल्यामुळे नालेसफाईचा खर्च वाया गेला असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. वडाळा ट्रक टर्मिनस येथील न्यू म्हाडा ट्रान्झिस्ट कॅम्पमधील नाल्यातील गाळ अद्याप काढलेला नसून तेथील नाले गाळाने भरलेले आहेत. रवी राजा यांनी गुरुवारी सायन, वडाळा भागातील नाल्यांची पाहणी केली असता नाले सफाईची कामे झालीच नसल्याचे आढळून आले. नालेसफाईच्या नावाखाली २८० कोटींची सफाई झाली असा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.

मुंबईतील नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र पहिल्या पावसांतच नाले तुंबुन पाणी साचते. दरवर्षी प्रमाणे यंदाही नाल्यातील गाळ उपसण्यासाठी २८० कोटी रुपये पालिकेकडून खर्च करण्यात येत आहेत. यंदा नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्षात १६ मार्चपासून सुरुवात झाली. नालेसफाईचे काम वेगाने सुरु असून १०० टक्के नाल्यातील गाळ उपसा केल्याचे पालिकेच्या संकेतस्थळावर दर्शवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात किती नालेसफाई झाली याची हे विविध राजकीय पक्षांनी उघडकीस आणले आहे. काँग्रेस पक्षाचे मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींसह वडाळा ट्रक टर्मिनस नाला, इंद्रा नगर नाला आदी ठिकाणच्या नालेसफाईच्या कामाची पाहाणी केली. म्हाडा न्यू ट्रान्झिस्ट कॅम्प येथील कोकरे नाल्याची सफाई झालीच नसल्याचा आरोप रवी राजा यांनी यावेळी केला.

हेही वाचा…सकाळी ९ नंतर शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयाला बगल ?

निवडणुकाजवळ आल्या की राजकीय नेते मंडळी फिरकतात. नालेसफाईच्या कामासाठी पालिकेचे कर्मचारी कधी तरी येतात काही वेळ काम करतात आणि निघून जातात. नाल्यातील गाळाचा उपसा केला जात नाही. काही वर्षांपूर्वी कोकरी नाल्यात पडून दोन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र आजपर्यंत नाल्याशेजारी राहणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत काही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे राहणारे रहिवासी दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहतात. तसेच म्हाडा न्यू ट्रान्झिट कॅम्प येथे २५ वर्षांपासून मातीचा रस्ता असून संपूर्ण परिसरात चिखल, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आता तर तेथील नाला गाळातच आहे, पाऊस सुरु झाला तरी गाळ उपसा केलेला नाही. हा सखल भाग असून नाल्याच्या दोन्ही बाजूला वसाहती आहेत. त्यामुळे मुसळधार पावसांत तेथे पाणी तुंबण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. संबंधित प्रशासन व नेते मंडळींनी त्वरीत लक्ष घालून तेथील प्रश्न सोडवावा, असे रहिवाशांनी म्हटले आहे.

मुंबईतील नालेसफाईची कामे समाधानकारक झाली असल्याचे मुंबई महापालिकेने केलेले दावे खोटे ठरले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी मुंबईतील अनेक ठिकाणचे नाले अद्याप गाळातच असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे.

हेही वाचा…अकरावी प्रवेश प्रक्रिया : उद्यापासून कोटांतर्गत प्रवेशासाठी पर्याय नोंदवता येणार

पाणी तुंबण्याच्या भीतीने बालवाडी बंद

वडाळा टीटी – कोकरे नाल्याच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीच्या वसाहती आहेत. अनेकांनी नाल्यावरच घरे उभारली आहेत. येथे मातीचा रस्ता असल्याने थोड्या पावसांतही चिखल होतो. त्यात कचऱ्याचे साम्राज्य. या वसाहतीच्या बाजूला बालवाडीचे वर्ग भरतात. मात्र थोड्या पावसातही तेथे पाणी तुंबत असल्याने ही बालवाडी बंद ठेवण्यात आली आहे. चांगला रस्ता नाही, दाटीवाटीची रहदारी त्यामुळे येथील मुलांना शाळांत जाणेही त्रासाचे ठरते आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यामुळे पावसांत दुर्गंधी पसरून साथीचे आजारांना सामोरे जावे लागते असे येथील रहिवाशांनी सांगितले. तसेच या परिसरात लेप्टोचाही धोका असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.