scorecardresearch

परीक्षा गोंधळ कायम; शासकीय आग्रहाचा विद्यापीठाच्या वेळापत्रकाला फटका

फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मुंबई विद्यापीठ आणि क्षेत्रातील महाविद्यालयांचा परीक्षा गोंधळ अद्यापही संपलेला नाही.

मुंबई : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मुंबई विद्यापीठ आणि क्षेत्रातील महाविद्यालयांचा परीक्षा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. सातत्याने शासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडून येणाऱ्या सूचनांमुळे तीन ते चारवेळा विद्यापीठाला वेळापत्रक बदलावे लागले. अद्यापही परीक्षेबाबतचा गोंधळ कायम आहे. त्याचबरोबर जून-जुलैमध्ये परीक्षा घेण्याच्या नव्या सूचनेमुळे विद्यापीठाचे पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रकही विस्कळीत होणार आहे.

राज्यातील विद्यापीठे स्वायत्त आहेत. परीक्षा, शैक्षणिक वर्षांचे नियोजन विद्यापीठे त्यांच्या स्तरावर करतात. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा १ जून ते १५ जुलै या दरम्यान घेण्याची सूचना विद्यापीठांना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सध्या मुंबई विद्यापीठाच्या बहुतेक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. बहुतेक स्वायत्त महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यांचे मूल्यांकनाचे काम सुरू आहे. महाविद्यालयांना कधी ऑनलाइन परीक्षा घेण्याची सूचना, कधी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याची सूचना असे गेले दोन महिने सुरू आहे. असे असताना अचानक महिनाभर परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचनेमुळे विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयांचे प्रशासनही गोंधळले आहे.
शासनाने सांगितलेल्या नव्या वेळापत्रकानुसार नियोजन केल्यास विद्यापीठाच्या पुढील शैक्षणिक वर्षांवरही त्याचा परिणाम होणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षाच १५ जुलैपर्यंत लांबल्यास त्यानंतर निकाल आणि मग नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांची मेहनत पाण्यात?
करोनामुळे दोन शैक्षणिक वर्षांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले. नवे शैक्षणिक वर्ष डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जवळपास एक वर्ष वाया गेले. शैक्षणिक वर्षांची घडी बसवण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासन यांनी प्रयत्न केले. सुट्टय़ा कमी करून, वेळेपेक्षा अधिक काम करून पुढील वर्षीच्या (२०२२-२३) शैक्षणिक वर्षांचे नियोजन पूर्वप्रमाणेच जूनपासून केले. मात्र आता शासनाच्या नव्या सूचनेची अंमलबजावणी केल्यास ही सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांनाही फटका
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानुसार विद्यार्थी त्यांचे पुढील नियोजन करत असतात. पुढील प्रवेश परीक्षांची तयारी, परदेशी जायचे असल्यास त्याची तयारी, परराज्यातील विद्यार्थ्यांना सुट्टय़ांसाठी त्यांच्या राज्यात परतायचे असते. आता परीक्षेच्या तोंडावर पुन्हा एकदा वेळापत्रक बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठ, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण वाढणार आहे.
वेळापत्रक कायम ठेवण्याची विनंती
विद्यापीठाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्या नियोजनानुसारच सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती विद्यापीठाने शासनाला केली आहे. त्यानुसार अद्याप सुरू न झालेल्या परीक्षांसाठी विषयांच्या परीक्षांमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नसंचही देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक बदल वेळापत्रकात करावे लागतील. मात्र, परीक्षा १ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात येणार नाहीत, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाच्या अनेक विद्याशाखांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्या नियोजनानुसारच होणार आहेत, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा या नियोजनानुसारच होतील. विद्यापीठाच्या काही परीक्षा या २५ मार्चपासून सुरू करण्यात आल्या आहेत. यापुढे सुरू होणाऱ्या परीक्षा या जाहीर केलेल्या पद्धतीनुसार व तारखांनुसार आयोजित केल्या जातील. प्रत्यक्ष होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रतितास १५ मिनिटे अधिकचा वेळ देण्यात येईल व दोन विषयाच्या परीक्षांमध्ये दोन दिवसाचे अंतर ठेवण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. – डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exam confusion persists government hits university schedule university mumbai colleges amy

ताज्या बातम्या