करोनाकाळात विविध कारणांनी एसटीतील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे नुकतेच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितले होते. त्यानुसार वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा विचार महामंडळाने सुरू केला आहे.

   या संदर्भात चाचपणी करण्याचे आदेश परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. करोनाकाळात वेतनाशी निगडित अशा कारणांवरूनच आत्महत्या झाली असेल, त्यालाच याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, मार्च २०२० ते आतापर्यंत ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

करोनाकाळात वेतन विलंबाने मिळू लागल्याने कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षापासून राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीवरच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होत असले तरीही तेही वेळेवर मिळत नव्हते. कमी वेतन, वेतन वेळेवर न मिळणे, बँकेचे थकलेले हफ्ते यासह अन्य समस्यांमुळे मानसिक तणावाखाली असलेल्या महामंडळाच्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी करोनाकाळात आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. यामध्ये काही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक कारणेही होती. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत १२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मार्च २०२१ ते १० ऑक्टोबरपर्यत ११ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली. त्यानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच होते. आणखी १५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली.

करोनाकाळात आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी चाचपणी करण्याचे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली हे तपासले जाईल. त्यानुसारच निर्णय  घेतला जाईल.

अनिल परब, परिवहन मंत्री, अध्यक्ष, एसटी महामंडळ