लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : राज्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड - पाली या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना गुरूवार, २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या गुरूवार, २५ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रायगड जिल्ह्यातील संबंधित तालुक्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी वाचा-मुंबईतील पाणी कपात येत्या सोमवारपासून मागे घेणार रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड - पाली या तालुक्यांमध्ये रात्रीपासून अतिवृष्टी झाल्याने व समुद्रास आलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय व कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनानेही या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.