दिवाळीत घरखरेदी उत्साहात; राज्यभर १७ हजार ३७० मालमत्तांची विक्री

करोनाकाळात मोठे आणि हक्काचे घर असणे ही गरज झाली आहे.

राज्यभर १७ हजार ३७० मालमत्तांची विक्री, सरकारला ३११ कोटींचा महसूल

मुंबई : दिवाळीत मालमत्ता बाजारपेठेत खरेदीच्या उत्साहाचे चित्र आहे. गृहविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात दिवाळीच्या केवळ तीन दिवसांत राज्यात १७ हजार ३७० घरे विकली गेली. त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रूपात ३११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. महत्त्वाचे म्हणजे यातील १०२ कोटींचा महसूल एकट्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मिळाला. 

 दिवाळीत दरवर्षी गृहखरेदी-विक्री सर्वाधिक वाढते. यंदाही राज्यात दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळाला असून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार दिवाळीच्या १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान १७ हजार ३७० घरांची विक्री झाली. त्यातून सरकारला ३११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. हे आकडे समाधानकारक मानले जात आहे.

करोनाकाळात मोठे आणि हक्काचे घर असणे ही गरज झाली आहे. त्यात गृहकर्जाचे व्याजदरही कमी झाले आहेत. करोनाचे सावट हळूहळू कमी होत असून परिस्थिती सुधारत आहे. परिणामी, याचा फायदा बांधकाम व्यवसायालाही होत आहे, असे विकासक नयन शहा यांनी  सांगितले.

सर्वाधिक नोंदणी मुंबईत

राज्यात विक्री झालेल्या १७,३७० घरांपैकी १,४४१ घरे मुंबईतील आहेत. ३११ कोटींपैकी १०२ कोटींचा महसूल सरकारला केवळ मुंबईतून मिळाला आहे. एकीकडे गृहविक्रीत वाढ झाली आहेच, पण त्याच वेळी दिवाळीत गृहनोंदणी, घरांबाबत चौकशी, ताबा आणि गृहप्रवेश अशा व्यवहारातही वाढ झाली आहे. अनेक विकासकांनीही आपल्या नवीन प्रकल्पाचा आरंभ केला आहे. करोनाचा फटका बसलेल्या मालमत्ता बाजारपेठेला दिवाळीच्या निमित्ताने चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

दिवाळीच्या तीन दिवसांत चांगली विक्री झाली. घरविक्रीत दिवसेंदिवस वाढ होत असून पुढेही असेच चित्र कायम असेल. – नयन शहा, विकासक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Excitement of buying a house on diwali sale of property 311 crore revenue to the government akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या