scorecardresearch

मुंबई: अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहानिमित्त विक्रोळी, गोरेगाव, लोअर परळ येथे प्रदर्शन

‘शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग :’ हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई अग्निशमन दलातर्फे सुरक्षा सप्ताहाअंतर्गत भायखळा मुख्यालयात १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता अग्निशमन दलातील शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

fire brigade
अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहानिमित्त विक्रोळी, गोरेगाव, लोअर परळ येथे प्रदर्शन (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

१४ ते २० एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या दुर्घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे निर्माण होणारी नवनवीन आव्हाने लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलातर्फे १४ ते २० एप्रिलदरम्यान राबविण्यात येणाऱ्या अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध प्रात्यक्षिकांच्या भित्तिपत्रकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात अग्निशमन दलातील साहित्य पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. विक्रोळी, गोरेगाव, लोअर परळ येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सलग दुसऱ्यांदा मुंबईला ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान; जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश

‘शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग :’ हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई अग्निशमन दलातर्फे सुरक्षा सप्ताहाअंतर्गत भायखळा मुख्यालयात १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता अग्निशमन दलातील शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यानिमित्ताने १४ ते २० एप्रिल या सप्ताहात अग्निशमन दलातर्फे विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, प्रदर्शन, पथसंचलन तसेच बक्षीस वितरण समारंभासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विक्रोळी येथील आर सीटी मॉल येथे १४ आणि १५ एप्रिल रोजी अग्निशमन दलातर्फे विविध प्रात्यक्षिकांची भित्तिपत्रके, तसेच अग्निशमन दलातील साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान वापरत असलेले अत्याधुनिक साहित्य नागरिकांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. असेच प्रदर्शन १६ आणि १७ एप्रिल रोजी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये, तर त्यानंतर १८ आणि १९ एप्रिल रोजी लोअर परळ येथील फिनिक्स मॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नागरिकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.

हेही वाचा >>>म्हाडाच्या ५६ निवासस्थानांमध्ये सेवानिवृत्तांचे बेकायदा वास्तव्य! नव्या सेवानिवासस्थानांसाठी सामान्यांच्या घरांवर डोळा?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना सांताक्रूझ येथील मैदानावर २० एप्रिल रोजी अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभात होणार असून यावेळी अग्निशमन दलाचे जवान पथसंचलन करणार आहेत. अग्निशमन दलातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि जवानांना या कार्यक्रमात बक्षीस प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 14:21 IST

संबंधित बातम्या