scorecardresearch

मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार ;मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई आणि महानगर प्रदेशातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून पूर्व आणि पश्चिम भागात जाण्या-येण्यासाठी वाहतुकीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून पूर्व आणि पश्चिम भागात जाण्या-येण्यासाठी वाहतुकीचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच वेळी पर्यावरण संवर्धनाकडेही लक्ष देण्यात येईल, असे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सांगितले.
या प्रकल्पातील गोरेगाव परिसरामधील उड्डाणपुलाचे भूमिपूजन गुरुवारी झाले. मुंबईच्या दक्षिण आणि उत्तर भागात जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सेवा उपलब्ध आहे. मात्र पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेतला आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्टय़े
• मुंबई उपनगरांतील पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता चौथा मार्ग.
• गोरेगाव (पूर्व)मधील ओबेरोय मॉल ते मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत १२.२ किलोमीटर लांबीचा जोडरस्ता
• जोडरस्त्यावर ५ ७ ५ मार्गिका
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ४.७ किलोमीटर लांबीचा १३ मीटर व्यासाचा जोडबोगदा आणि दादासाहेब फ़ाळके चित्रनगरीमधून जाणाऱ्या १.६० किलोमीटर लांबीच्या पेटी बोगदा आणि त्यांचे पोहोच रस्त्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. हे बोगदे ३ ७ ३ मार्गिकेचे आहेत.
• गोरेगाव बाजूकडील जोडरस्त्याचे ओबेराय मॉल ते दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात ‘फिल्म सिट’पर्यंतच्या २.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर असून मुलुंड बाजूकडील तानसा पाइपलाइन ते पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शनपर्यंतच्या २.७ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचेही काम प्रगतिपथावर.
• या जोडरस्त्यावर होणारी संभाव्य वाहतूक विचारात घेऊन गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून रत्नागिरी हॉटेल चौकावरून जाणारा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. दिंडोशी न्यायालयाजवळ पादचाऱ्यांसाठी पादचारी पूल सरकत्या जिन्यासह प्रस्तावित आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expansion infrastructure considering needs mumbaikars statement minister aditya thackeray amy

ताज्या बातम्या