खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेची मुंबईत पोस्टरबाजी

भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेने काढलेल्या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

ठाकरे सरकार आणि त्यांचं पेंग्विनप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.

मनसेकडून मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून येत आहे. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही मनसेने लगावला आहे.मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे.


भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेने काढलेल्या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना डॉक्टरांची नियुक्ती का केली जात आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते रवी राजा यांनी उपस्थित के ला आहे. पालिकेने काढलेल्या १५ कोटी रुपयांच्या निविदा या उधळपट्टी असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

पेंग्विनच्या देखभालीसाठी होणारा खर्च हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. पेंग्विन देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत. तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय बाबींचाही समावेश आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना खासगी डॉक्टरांच्या नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. करोनाकाळात पालिका अनावश्यक खर्च करत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. तसेच निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पेंग्विन हे उद्यानाचं आकर्षण आहे.पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केल्यास त्यांच्या जिवाशी खेळण्या सारखे होईल. तेव्हा कोणतीही तडजोड होणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. परंतु प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Expenses for penguins in mumbai mns slams maharashtra government vsk

ताज्या बातम्या