मुंबई : पाणथळ प्रदेश अत्यंत महत्त्वाची परिसंस्था असून ती जैवविविधता, हवामान बदलाशी जुळवून घेऊन त्याची तीव्रता कमी करणे, गोड्या पाण्याची उपलब्धता करणे तसेच इतर अनेक बाबींमध्ये मोलाची भूमिका बजावते. मुंबई शहरातील वाढत्या नागरी प्रश्नांवर उपाययोजना करत असताना अनेकदा निसर्गाचा बळी जातो. नुकताच वर्सोवा-भाईंदर सागरी मार्ग प्रकल्पासाठी सुमारे ४५ हजार खारफुटी तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईच्या संदर्भांत पाणथळ जमिनी या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. खारफुटींची जंगले, गवत तसेच इतर वनस्पती असेलेल्या जमिनींना पाणथळ प्रदेश असे म्हटले जाते. नदी, तलाव, समुद्रकिनारे आणि विशेषतः खाडीचे भाग अशा ठिकाणी पाणथळ प्रदेश दिसून येतात. भूगर्भातील पाण्याचे पुर्नभरण करण्याच्या कामासोबतच प्रदूषित पाणी शुद्ध करण्याचे काम अशा जमिनी करतात. हे प्रदेश देशी पक्षांसह स्थलांतरित आणि शिकारी पक्ष्यांचा अधिवास असून त्याचे क्षेत्र कमी होत असल्याने पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे.

जागतिक पाणथळ-भूमी दिन का साजरा केला जातो ?

१९७१ साली इराणमधील ‘रामसर’ शहरात पाणथळ प्रदेशांचे महत्व या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रामसर करार २ फेब्रुवारी १९७१ रोजी रामसर शहरात स्वीकारण्यात आला. पुढे १९९७ पासून जागतिक पाणथळ-भूमी दिन साजरा केला जातो.

मुंबईला धोका का ?

पाणथळ प्रदेशात खारफुटीची दाट झाडी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. समुद्र तटांचे वादळापासून सरंक्षण करणे तसेच समुद्र किनाऱ्याची धूप थांबवणे तसेच पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अतिरिक्त पाणी या पाणथळ प्रदेशांमध्ये मुरते आणि शहरांचे संरक्षण होते. मात्र, मुंबईत सध्या विकासाच्या रेट्यात अनेक प्रकल्प सुरु आहेत, काही नव्याने होऊ घातले आहेत या सगळ्या कांदळवन क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. यामुळे भविष्यात मुंबईला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

रामसर संघटनेच्या जागतिक पाणथळ-भूमी दिनाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, जागतिक पातळीवर पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि संरक्षण होण्याच्या दृष्टीने पारंपरिक ज्ञानाला महत्व देण्यात आले आहे.

पाणथळ प्रदेशांचे संरक्षण केवळ वैज्ञानिक आणि तांत्रिक उपायांवर अवलंबून नाही. तर पिढ्यान्पिढ्या आदिवासी समाज आणि स्थानिक नागरिकांची निरीक्षणे , त्यांच्यामध्ये असलेली निसर्ग रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव आणि आदर यावर आधारित ज्ञानातूनच पाणथळ जमिनींचे संरक्षण झाले आहे. म्हणून यावर्षी ‘पाणथळ प्रदेश आणि पारंपरिक ज्ञान : सांस्कृतिक वारशाचा उत्सव’ अशी संकल्पना आहे. -प्रा. सेलेस्टे साउलो, महासचिव, जागतिक हवामानशास्त्र संघटना