मुंबई : भारताला ‘डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ ही ओळख मिळाल्यापासून मधुमेहाचा आरोग्यावर होणारा सर्वांगीण परिणाम जास्त अधोरेखित केला जात आहे. रक्तातील साखरेची पातळी, आहारनियमन, व्यायाम यावर सरकार आणि आरोग्यसंस्था भर देत असतानाच तज्ज्ञ आता एका अधिक शांत, परंतु भयावह धोक्याकडे लक्ष वेधत आहेत. देशातील मधुमेही रुग्णांच्या डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर)या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दृष्टिहीनतेच्या जागतिक आकडेवारीत भारताचा वाटा जवळपास एकतृतीयांश आहे. देशातील सुमारे १.१ कोटी लोक विविध रेटिनल आजारांनी ग्रस्त आहेत. त्यात डायबेटिक रेटिनोपॅथी हा कामकाजाच्या वयातील लोकांमधील प्रतिबंध करता येऊ शकणाऱ्या अंधत्वाचे प्रमुख कारण ठरत असल्याचे नेत्रविशारदांचे मत आहे.देशात सुमारे १० कोटी लोक मधुमेहाने त्रस्त, तर १३.६ कोटी प्री-डायबेटिक असल्याचे आरोग्य संस्थांचे ताजे अंदाज सांगतात.रेटिना तज्ज्ञांच्या मते,डीआर चे सुरुवातीचे टप्पे पूर्णपणे लक्षणविरहित असतात. रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी हळूहळू रेटिनातील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवते. एकदा दृष्टी ढासळू लागल्यानंतर उपचार कठीण आणि खर्चिक ठरतात. त्यामुळे ‘अर्ली डिटेक्शन’ हा दृष्टीरक्षणाच्या लढाईतील सर्वात मोठा बदलाचा बिंदू ठरू शकतो.
दृष्टी हा शरीराच्या आरोग्याचा पडदा किंवा आरसा आहे. तो जपणे अत्यंत महत्त्वाचे असून मधुमेहाच्या रुग्णांनी प्रामुख्याने वर्षातून एकदा तरी नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन डोळ्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेह व एंडोक्राईन तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. मधुमेही रुग्णांना डोळ्याचे विविध आजार होऊ शकतात.यात मोतीबिंदुचा धोका जास्त असून मधुमेही रुग्णांना लवकर मोतीबिंदू होणे व पिकणे तसेच मोतीबिंदू कठीण होण्याचा धोका जास्त असतो. मधुमेह व रक्तदाबाचा प्रश्न जवळपास ८० टक्के शहरी लोकांमध्ये दिसून येत असून रेटिनाची समस्याही वाढताना दिसत असल्याचे डॉ जोशी यांनी सांगितले.
आता एआय ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारेही डोळ्याचे मॅपिंग करता येते.तसेच एआयच्या माध्यमातून टाईप २ मधुमेह रिव्हर्सल करण्याचेही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.या विषयावर काही शोधनिंबध डॉ जोशी यांनी प्रकाशित केले असून मधुमेही रुग्णांनी ‘वॉटस््ॲप व्हिजन सिंड्रोम’पासून सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ जोशी म्हणाले. मधुमेही रुग्णांना संगणक, मोबाईल तसेच लॅपटॉप आदीपासून दिवसातून किमान तासभर तरी दूर राहाणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी देशभरात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. ग्रामीण भागातील स्क्रिनिंग सुविधा, मोबाईल आयक्लिनिक, टेलिमेडिसिन आणि एआय आधारित तपासणी यांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात येत आहे.मधुमेह हा केवळ साखरेचा आजार नसून, दृष्टी हिरावणारा शांत शत्रू आहे, हे आता अधिक स्पष्ट होत आहे. जागरूकता, तपासणी आणि वेळेवर हस्तक्षेप या तीन सूत्रांवर आधारित धोरणे राबवली तर भारतातील कोट्यवधींची दृष्टी वाचू शकते.जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील डोळ्यांच्या आरोग्याबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इंडियन डायबिटीज सोसायटी यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात सुमारे १२ टक्के प्रौढ लोकसंख्येला मधुमेहाचा त्रास असून त्यापैकी जवळपास पाचपैकी एक जण डोळ्यांच्या गुंतागुंतींनी ग्रस्त आहे.आयसीएमआर- आयएनडीआयएबीच्या अभ्यासानुसार मधुमेह असलेल्या ५० वर्षांवरील भारतीयांपैकी सुमारे १६.९ टक्के रुग्णांना डायबेटिक रेटिनोपथी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अशी स्थिती आहे ज्यात डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर साखरेचा परिणाम होऊन हळूहळू दृष्टी मंदावते. यातील ३.६ टक्के रुग्णांना ‘दृष्टीस धोका असलेली’ रेटिनोपथी असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.विशेष म्हणजे, ग्रामीण भागात हा दर १५.५ टक्के, तर शहरी भागात २०.७ टक्के एवढा आहे. म्हणजेच शहरातील जीवनशैली आणि बदललेली आहारपद्धती ही जोखमीची प्रमुख कारणे ठरत आहेत.
सर्वात चिंतेचा मुद्दा म्हणजे देशातील सुमारे ९० टक्के मधुमेही नागरिकांनी कधीच फंडस तपासणी (डोळ्याच्या आतली तपासणी) केलेली नाही, असे इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीने नमूद केले आहे. परिणामी, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे नुकसान बहुतांशवेळी उशिरा लक्षात येते.जेव्हा दृष्टी कमी होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
सद्याच्या आकडेवारीनुसार, भारतात ३.३५ ते ४.५५ लाख लोकांना ‘दृष्टीस धोका असलेली’ डायबेटिक रेटिनोपथी असल्याचा अंदाज आहे. या रुग्णांपैकी मोठा हिस्सा अजूनही योग्य वैद्यकीय उपचारांपासून दूर आहे.जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डोळ्यांच्या आरोग्याबाबत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मधुमेहामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या परिणामामुळे होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपथी या आजाराचे प्रमाण महाराष्ट्रात वाढत असून, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये तपासणीचा अभाव मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे.
आयसीएमआर व इंडियन डायबिटीज सोसायटी यांच्या ताज्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ५.६७ टक्के मधुमेही रुग्णांना डीआर असल्याचे निदर्शनास आले आहे. तर आदिवासी भागात हा दर ७.७३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के जणांना ‘दृष्टीस धोका असलेली’ रेटिनोपथी असल्याचे स्पष्ट झाले आहे.तज्ज्ञांच्या मते हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा किंचित कमी असला तरी गंभीर प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.
