scorecardresearch

होळीनिमित्त कोकणासाठी एसटीच्या १०० जादा गाडय़ा

खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूट थांबावी आणि होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसव्यतिरिक्त १०० जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूट थांबावी आणि होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसव्यतिरिक्त १०० जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १६ मार्चपासून या गाडय़ा सोडण्यास सुरुवात केली असून त्या २७ मार्चपर्यंत धावतील, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. मात्र महामंडळाने जादा गाडय़ा सोडण्यास सुरुवातही केल्याची माहिती आधीच प्रवाशांना न दिल्याने गोंधळाचीच परिस्थिती आहे.  होळीनिमित्त पंधरा दिवस ते एक महिना आधीच जादा गाडय़ांची घोषणा होऊन त्या प्रवाशांना आरक्षणासाठी उपलब्ध करतात. मात्र संपामुळे एसटीचे वेळापत्रकच बिघडले आहे. संपात मोठय़ा संख्येने चालक, वाहक असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीची सेवाही फारशी नाही. त्यामुळे महामंडळाने होळीनिमित्त जादा गाडय़ा आधीच उपलब्ध केल्या नाही. त्याचा गैरफायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेण्यास सुरुवात केली आणि दुप्पट ते तिप्पट भाडे दर आकारणी केली आहे. खासगी वाहतूकदारांकडून लूट थांबावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने १०० जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून बसगाडय़ा मागविण्यात आल्या आहेत. कमी मनुष्यबळामुळे कार्यरत चालक, वाहकांना डबल डय़ुटी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extra st trains konkan occasion of holi private migrants ysh

ताज्या बातम्या