मुंबई : भारतात यंदा तीव्र उन्हाळ्याचा सामना नागरीकांना करावा लागत आहे.अनेक राज्यातील उकाड्यात लक्षणीय वाढ झाली नोंदली जात आहे. एक्यूआय संकेतस्थळानुसार, सलग दुसऱ्या जगभरातील शंभर उष्ण शहरांच्या यादीत भारतातील एकूण ९७ शहरांचा समावेश आहे. याआधी एप्रिल महिन्यातही उष्णतेत लक्षणीय वाढ झाली होती. त्यावेळीही जगभरातील शंभर उष्ण शहरांच्या यादीत भारतातील ९५ शहरांचा समावेश झाला होता.
यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच जगभरातील हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, ‘एल निनो’ स्थिती ही आतापर्यंत इतिहासात नोंद झालेल्या स्थितीहून अधिक तीव्र म्हणजेच ‘सुपर एल निनो’ असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतातही येत्या काही काळात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याही भारतातील राजस्थान उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच पंजाबसह काही राज्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. यामुळे तापमानाचा पारा ४७- ४८ अशांवर पोहोचला असून उष्णतेमुळे नागरिकांची अक्षरश: होरपळ होत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी आणखीन काही दिवसांचा अवधी असताना नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील वाढत्या उष्णतेची स्थिती चिंताजनक
जगातील सर्वात उष्ण शहरे भारतातील उत्तरप्रदेश राज्यात आहेत, या राज्यातील एकूण ३४ शहरे जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत आहेत. यात प्रयागराज, वाराणसी, हातरस, आग्रा तसेच पीलीभीत यासंह अनेक शहरांचा समावेश आहे. तर या यादीत महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, झारखंड आणि चंदीगड आदी राज्यांतील काही शहरांचा समावेश आहे.
या यादीत महाराष्ट्रातील कोणती शहरे ?
राज्यातील विदर्भात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती असून या प्रदेशातील बहुतांश शहरात तापमानाचा पारा ४५ अशांवर पोहोचला आहे. तसेच किमान तापमानातही वाढ झाली असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळीही उष्णतेचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यातही काही काळ या प्रदेशात
उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद झाली होती. जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि ब्रह्मपुरी या शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस या प्रदेशात हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज असून विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘ओरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
