मुंबई : मेट्रो ३ साठीची (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच रखडलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो ६ साठीच्या (स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्ग) कारशेडचा प्रश्न कसा मार्गी लावणार? असा प्रश्न आता पर्यावरणप्रेमींकडून शिंदे आणि फडणवीस यांना विचारला जात आहे.        

फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो ६ ची कारशेड कांजूरमार्ग येथील जागेत करण्यास मंजुरी दिली होती. आता याच जागेला फडणवीस विरोध करत आहेत. त्यामुळे मेट्रो ६ च्या कारशेडचा पेच कसा सोडविणार असाही प्रश्न आता उपस्थित होत असून मेट्रो ६ च्या कारशेडचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे.

आरे कारशेडला होणारा विरोध आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात आरेतील कारशेड रद्द केले. मेट्रो ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथील ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे त्या जागेवर मेट्रो ३ चे कारशेड उद्धव ठाकरे यांनी हलविले.

कांजूर येथे मेट्रो ३ चे कारशेड हलविल्याबरोबर पहिला विरोध झाला तो फडणवीस यांच्याकडून. आजही त्यांचा मेट्रो ३ च्या कांजूर येथील कारशेडला विरोध आहे. फडणवीस यांच्या या  विसंगत भूमिकेवर पर्यावरणप्रेमींनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मेट्रो ३, मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो ६ आणि मेट्रो १४ (बदलापूर ते कांजूरमार्ग) अशा चारही मेट्रो मार्गिकेची कारशेड एकाच जागी  करण्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे पैसा, जागा आणि वेळेची बचत होईल असे म्हणत कांजूरमार्ग ‘‘ मेट्रो हब ’’ म्हणून विकसित करण्याचाही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. मात्र याला फडणवीस यांनी आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही विरोध केला.

 कांजूरच्या जागेवर मालकी दावा करत केंद्राने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कांजूरच्या कामाला स्थगिती दिली आणि चारही कारशेड रखडले. 

 पर्यावरणप्रेमींनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

फडणवीस यांनी विरोध का केला?

फडणवीस यांनी २०१८ मध्ये मेट्रो ६ साठीचे कारशेड कांजूरमार्ग येथे बांधण्यास मंजुरी दिली. त्यानुसार एमएमआरडीएने पुढील कार्यवाहीही सुरू केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी मेट्रो ३ चे कारशेड येथे हलविल्यानंतर फडणवीस यांनी विरोध का केला? असा सवाल वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला. एमएमआरडीएने मेट्रो ४ चे कारशेड ठाण्यातील मोगरपाडा येथे करण्याचे निश्चित केले आहे. तसेच मेट्रो १४ चे काम होण्यासाठी आणखी बराच काळ बाकी आहे. तेव्हा आता मेट्रो ३ आणि मेट्रो ६ च्या कारशेडचा प्रश्न आहे. फडणवीस यांनी मेट्रो ३ चे कारशेड आरेतच करण्याची भूमिका आता पुन्हा उचलून धरली आहे. पण आम्ही आरेत कारशेड होऊच देणार नाही, असा इशाराही स्टॅलिन यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो प्रकल्पाला वेग देऊ असे जाहीर करणारे शिंदे आणि फडणवीस मेट्रो ६ च्या कारशेडचा प्रश्न कसा सोडविणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.