शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच्या ‘मुंबई बंद’बाबत फेसबुकवर प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या दोघा तरुणींवर कारवाई केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर व पालघरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आले. तसेच पालघरच्या दंडाधिकाऱ्यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली. या घडामोडीमुळे हे प्रकरण पुन्हा चिघळले असून या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी ‘पालघर बंद’ पुकारला असून  शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
पोलीस अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. त्याचबरोबर एकूण हे फेसबुक प्रकरण हाताळण्यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक संग्राम निशांदर यांना समज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुक प्रकरणात अशा प्रकारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यावर झालेली ही मोठी व गंभीर कारवाई असल्याचे मानले जात आहे.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी पाळण्यात आलेल्या बंदबद्दल शाहिन धाडा व रीणू श्रीनिवासन या दोन तरुणींनी फेसबुकवर नोंदविलेल्या प्रतिक्रियांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या दबावामुळे पालघर पोलिसांनी या दोन तरुणींच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण अधिकच वादग्रस्त ठरले. सरकारही त्यामुळे अडचणीत आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुखबिंदर सिंग यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी त्या दोन तरुणींवर केलेली कारवाई चुकीची होती, असा ठपका ठेवणारा अहवाल सरकारला सादर केला होता. त्याची सरकारने गंभीर दखल घेऊन थेट पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. याप्रकरणात कारवाई करू नका, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांनी दिले होते. त्याकडे दुर्लक्ष करून त्या दोन तरुणींच्या विरोधात चुकीची कलमे लावून तसेच चुकीच्या नोंदी करून त्यांना अटक करण्यात आली. वरिष्ठांचा आदेश धुडकावून केलेली कारवाई म्हणजे शिस्तीचा भंग केला, त्याची गंभीर दखल घेऊन सेनगावकर व पिंगळे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले. यापुढे माहिती तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना किंवा या कायद्याखाली गुन्हा नोंदविल्यानंतर कारवाई करण्यापूर्वी वरिष्ठ सरकारी वकिलांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना  अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यापुढे खबरदारी घेण्याचे आदेश
माहिती तंत्रज्ञान कायद्याशी संबंधित कारवाई करण्यापूर्वी वरिष्ठ सरकारी वकिलांचा सल्ला घ्यावा. तसेच व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत.
पालघरच्या महानगरदंडाधिकाऱ्यांचीही बदली
या तरुणींना न्यायालयीन कोठडी सुनावणारे महानगर दंडाधिकारी आर. जी. बगाडे यांचीही बदली करण्यात आली. गृहमंत्रालय, मुख्य दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सोमवारी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी महानगरदंडाधिकारी बगाडे यांची जळगाव येथे बदली करण्यात आली.