केईएम, कस्तुरबामध्ये सुविधा ; ओमायक्रॉनच्या पडताळणीसाठी परदेशातून आलेल्या बाधितांच्या चाचण्या

मुंबईत हजाराहून अधिक प्रवासी आफ्रिकेसह ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या १८ देशांमधून आले आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : आफ्रिकेसह १२ देशांमधून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूची बाधा झाली आहे का याची पडताळणी आता केईएम आणि कस्तुरबा या दोन प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. एस जनुकाचा वापर केलेली आरटीपीसीआर चाचणी या प्रयोगशाळांमध्ये होणार असून बाधित प्रवाशांचे नमुने येथे चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस, एन, ई आणि ओरएफ हे जनुकीय घटक असतात.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केल्यास नमुन्यामध्ये एन हा जनुकीय घटक अस्तित्वात नसल्याचे बहुतांश प्रयोगशाळांच्या अहवालात निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा जनुकीय घटक नसल्याचे आरटीपीसीआर चाचणीत दिसल्यास ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समजण्यात यावे, असे सूत्र प्राथमिक पडताळणीसाठी वापरता येईल. परंतु अंतिम निर्णयासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेिन्सग) चाचण्या करणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत हजाराहून अधिक प्रवासी आफ्रिकेसह ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या १८ देशांमधून आले आहेत. यातील बाधितांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे का याचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी या बाधितांच्या एस जनुकीय आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली असून लवकरच चाचण्या सुरू केल्या जातील, असे पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

चाचण्यांची सुविधा केईएममध्ये उपलब्ध असून अद्याप एकही नमुना चाचणीसाठी आलेला नाही, असे केईएमच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गीती नटराज यांनी सांगितले.

अल्फामध्येही एस जनुकीय अनुपलब्ध

अल्फा या करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारामध्येही एस जनुक उपलब्ध नव्हते. परंतु हा करोनाचा प्रकार भारतात आढळलेला नाही. त्यामुळे एस जनुक अस्तित्वात नसल्यास त्या व्यक्तीला ओमायक्रॉनमुळे बाधा झाली असल्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

आरटीपीसीआरमध्ये करोनाची बाधा झाल्याचे निदान

सर्वसामान्यपणे आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दोन जनुकीय घटकांचा वापर करून निदान केले जाते. आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या बहुतांश चाचण्या संचामध्ये एस हा जनुकीय घटकाचा वापर केलेला नाही. परंतु ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे का याचे निदान सध्या वापरल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांमधून करता येणार आहे.  प्रवाशांची संख्या वाढल्यास एस जनुकीय घटकांचा वापर केलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या वापर करण्याविषयी विचार केला जाईल, असे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

एस जनुकीय चाचणी तपासणीचे फायदे

मुंबईत कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेिन्सग) प्रयोगशाळा उपलब्ध आहे. परंतु ही चाचणी करण्यासाठी एकावेळी ३५० नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच या चाचणीचे अहवाल येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. एस जनुकासह आरटीपीसीआर चाचणी करणे तुलनेने सोपे आहे. तसेच त्याचे अहवालही काही तासांत उपलब्ध होऊ शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facility at kem kasturba for covid 19 omicron variant test zws