मालक, व्यापाऱ्याला बेड्या
मुंबई : बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासह कारखान्याच्या मालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून एक कोटी ४० लाख रुपये किंमतीची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली. पालघर आणि वसई येथील कारखान्यांत बनावट सौंदर्य प्रसाधने बनवून त्यांची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात, तसेच गुजरात, नवी दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये विक्री करण्यात येत होती.
गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाने ही कारवाई केली. नामांकीत कंपनीच्या बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री करण्यासाठी रेतीबंदर परिसरात एक जण येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पथकाने माहीम रोतीबंदर येथे सापळा रचून बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा वितरित करण्यासाठी आलेल्या टेम्पोची झडती घेतली. टेम्पोमधून एकूण १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी स्वामींत्व हक्क कायाद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.




हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याने बनावट सौंदर्य प्रसाधने पालघर येथील त्याच्या गोदामवजा कारखान्यात आणि वसई येथील व्यापाऱ्याच्या कारखान्यात तयार केल्याची माहिती मिळाली. त्यांची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात, तसेच गुजरात, नवी दिल्ली, इत्यादी राज्यांमध्ये विक्री करीत असल्याचे आरोपींनी कबुल केले. त्यानुसार, तीन वेगवेगळी पथके तयार करून नालासोपारा येथील गोदाम व सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकून विविध नामवंत कंपन्यांची बनावट उत्पादने तसेच ती बनविण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र व कच्चा माल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने कारखान्याच्या मालकालाही अटक केली. या दोघांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरण्यात येणारे लॅक्मे व इतर नामांकीत कंपनीच्या नावाची रिकामी वेष्टने, स्टिकर्स, पॉकींगचे साहित्य, सुटी कॉसमॅटीक पावडर, यंत्र असा एकूण १ कोटी ४१ लाख ७४ हजार ८१५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.