मुंबई : भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यावरून घेतलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ तारखेला मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीर सभेच्या माध्यमातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. लगेचच दुसऱ्या दिवशी १५ तारखेला ठाकरे यांच्या आरोपांना फडणवीस हे मुंबईतील जाहीर सभेत प्रत्युत्तर देणार आहेत. यामुळे ठाकरे-फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता गाजणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली असून ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर शनिवारी ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस ज्येष्ठ भाजप नेत्या पंकजा मुंडे मात्र अनुपस्थित असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मतदान केंद्र (बूथ) निहाय कार्यकर्त्यांची फळी उभारणे, शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठका यासह पक्षबांधणीचे काम भाजपने नियोजनपूर्वक सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारविरोधात वातावरण तापविण्यासाठी भाजप हा मुद्दा लावून धरणार आहे. त्या दृष्टीने रणनीती ठरविण्यासाठी ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक आयोजित केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय मतांवर भाजपची मोठी मदार असणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मोर्चातर्फे १५ मे रोजी ही सभा आयोजित केली आहे.