उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधील काही नेत्यांनी विरोध केल्याने आणि पुन्हा ब्राह्मण मुख्यमंत्री करता येणार नाही, असे जातीय समीकरणांचे कारण देत भाजप पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झटका दिला. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फारसे सख्य नाही. फडणवीस यांचा शब्द महाराष्ट्रात अंतिम असतो, असे समीकरण रूढ झाले होते. ते मोडून काढून पक्षनेतृत्वाने फडणवीस यांना धक्का दिल्याचेही मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन होत असताना भाजप सरकार सत्तेत येण्यासाठी फारसे प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद हिरावले गेले. तोच प्रकार पुन्हा याही वेळी दिसून आला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणवीस यांनी बराच आटापिटा केला. शिंदे गट फोडण्याची तयारी करून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलणी केली होती. फडणवीस यांनी पडद्याआडून हालचाली करून व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राजकीय चाली खेळल्या. पण शिंदे यांच्यासमवेत भ्रष्टाचार व अन्य प्रकरणांमध्ये अडकलेले नेते असल्याने शहा यांना फडणवीस यांच्या सत्तास्थापनेच्या हालचाली फारशा पसंत नव्हत्या. तरीही फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेतली व ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील व शिंदेंना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी अटकळ होती. फडणवीस यांनाही बुधवारी रात्री उशिरापर्यंत हेच वाटत होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सकाळी फडणवीस यांना दूरध्वनी करून शिंदे यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्याचे निर्देश दिले. प्रचंड परिश्रम केल्यावर भाजपची सत्ता येत असताना आणि राज्यसभा व विधान परिषदेत मोठा विजय मिळवूनही पक्ष नेतृत्वाने अन्याय केल्याने बुधवारी रात्रीपर्यंत उत्साहात असलेले फडणवीस प्रचंड नाराज झाले. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री पुन्हा करू नये, असे मत काही नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केले होते. शिंदे हे मराठा समाजातील आहेत. शरद पवार यांनी फडणवीस हे ब्राह्मण समाजातील असल्याने काही वक्तव्ये केली होती. तर शिंदे हे शिवसेनेतून बाहेर का पडले, भाजप शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असेल, तर आनंदच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे जातीय समीकरणांचे कारण देत फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कापला गेला. शिंदे यांच्याबरोबर असलेले ३९ आमदार किती काळ त्यांच्याबरोबर राहतील, ते ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा जातील का, याची खात्री भाजप श्रेष्ठींना वाटत नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यातून वेगळा संदेश जाईल आणि ठाकरे यांच्याबरोबर असलेले आमदार शिंदे खेचून आणतील. उद्धव ठाकरे यांनी भाजपला दगाफटका केल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपविण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे. गेल्या अडीच वर्षांतील महाविकास सरकारच्या कारभारामुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारला सावरण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रीपद हाती घेण्यापेक्षा दीर्घकालीन फायदा गृहीत धरून आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शिंदे यांच्या गटामुळे मिळणारा राजकीय लाभ लक्षात घेऊन शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

चर्चा काय? भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांभाळत असताना फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांच्या मर्जीतील नेते झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळातही फडणवीस हे कायम पंतप्रधान मोदी यांच्या नजीकचे नेते मानले जात होते. फडणवीस यांना आव्हान देणारे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व अन्य नेत्यांचे खच्चीकरण झाले. भाजपने २०१९ मध्ये सत्ता गमावल्यानंतरही राज्यातील पक्ष निर्णयांमध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कोणीही उरले नव्हते. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न देता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावून शहा व अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांचे खच्चीकरण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis shah no brahmin chief minister opposition bjp leaders ysh
First published on: 01-07-2022 at 01:26 IST