मुंबई : फेअर प्ले या बेटिंग ॲपमधील सट्टेबाजीत जिंकलेली रक्कम विजेत्यांना वितरीत करण्यासाठी पेमेंट गेटवे सेवेचा गैरवापर करण्यात येत असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाली आहे. त्याबाबत ईडीने दिल्ली, मुंबई व नोएडा येथील नऊ ठिकाणी छापे टाकले. अशाच एका सट्टेबाजीशी संबंधीत ईडीने गुजरातमध्ये २० ठिकाणी छापे टाकले होते. त्यात पेमेंट गेटवे गैरवापराप्रकरणी १५ दिवसांमध्ये ८०० कोटी रुपये पेयमेंट गेटवेद्वारे पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी या कार्यपद्धतीची माहिती ईडीला मिळाली होती. फेअरप्ले अॅपद्वारे आयपीएल सामन्यांचे बेकायदेशीर प्रसारण व लोकसभा निवडणूकीतील सट्टेबाजीप्रकरणात ईडी तपास करत आहे.
हेही वाचा >>> Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
फेअरप्लेमधील सट्टेबाजीतील विजेत्यांची रक्कम वितरणासाठी पेमेंट गेटवेचा गैरवापर करण्यात येत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ९ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. फेअर प्ले सट्टेबाजी ॲपमधील विजेत्यांची रक्कम वितरीत करण्यासाठी हवाला ऑपरेटर पेमेंट गेटवेद्वारे रक्कम देणाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विजेत्यांची बँक खात्याची माहिती व त्यांची जिंकलेली रक्कम यांची यादी पुरवण्यात येते. त्यानंतर पेमेंट गेटवे सुविधेचा गैरवापर करून ती रक्कम संबंधीत विजेत्यांना पुरवण्यात येते. तपास यंत्रणेच्या नजरेत न येण्यासाठी या कार्यपद्धतीचा वापर करण्यात येत होता. बेटींग प्रकरणात नुकतीच ईडीने गुजरातमध्ये छापे टाकले होते. त्यावेळीही पेमेंट गेटवेचा वापर करून १५ दिवसांत ८०० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी ईडीला या कार्यपद्धतीची माहिती मिळाली होती.
हेही वाचा >>> सीएसएमटीवरून २४ डब्यांची गाडी धावणार, फलाटांचे विस्तारीकरण अंतिम टप्प्यांत
फेअर प्ले या ॲपवर आयपीएल सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले होते. वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. यावेळी सुमारे ४० कलाकारांनी या फेअर प्ले ॲपची जाहिरात केली होती. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार वायकॉम १८ ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे आता ईडीनेही याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला होता. छत्तीसगडमधील न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात महादेव अॅपशी संबंधीत ६० अॅपची माहिती दिली होती. त्यात फेअरप्लेचेही नाव होते. फेअर प्लेने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेचा वापर करून ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करण्यात आले. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता.