मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) सुमारे ५० कोटी रुपयांची प्रलंबित देयके मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून अकोल्यातील एका कंत्राटदाराची तीन कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण (४०) याला अटक केली. आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर कंत्राटदाराला संशय आला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

अकोल्यातील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची पीडब्ल्यूडीकडील सुमारे ५० कोटी रुपयांची देयके प्रलंबित होती. याचाच फायदा घेत आरोपीने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याची बतावणी केली. प्रलंबित देयके मंजूर करून देण्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्याने ओबेरॉय यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतल्याचा आरोप आहे. १० सप्टेंबर रोजी ओबेरॉय यांना मुंबईत बोलावण्यात आले. त्यावेळी आरोपीच्या कथित साथीदारामार्फत एक कोटी २५ लाख रुपये स्वीकारण्यात आले. त्यानंतर आणखी दोन कोटी रुपये देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा प्रकारे एकूण तीन कोटी २५ लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली.

पैसे न दिल्यास आधी दिलेली रक्कम वाया जाईल आणि देयके मंजूर होणार नाहीत, अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच घेतलेली रक्कम कुठे ठेवण्यात आली आहे, याचा तपास सुरू आहे. व्यवहारासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्याचाही पोलिसांचा प्रयत्न आहे. अशाच पद्धतीने अन्य कंत्राटदारांचीही फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वारंवार पैशांची मागणी होत असल्याने ओबेरॉय यांना संशय आला. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी मंत्रालयात जाऊन संबंधित व्यक्तीबाबत चौकशी केली. मात्र, त्या नावाची व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा संबंधित शासकीय विभागात अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करून पोलिसांनी आसिफ पठाण याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.