शुक्रवारी संध्याकाळनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचं ट्विट पसरवुन, विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा पेपर रद्द झाल्याची बातमी पसरली होती. यानंतर मुंबई विद्यापीठाकडून तावडे यांचं अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यानंतर तावडे यांनी स्वतः ट्विट करत आपलं अकाऊंट हॅक झालं नसून, आपल्या नावाने चुकीची माहिती देणारा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पसरवला जात असल्याचं म्हटलं.

सध्या राज्यात परीक्षांचं सत्र सुरु आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी विद्यापीठाच्या वाणिज्या शाखेचा पेपर तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं विनोद तावडेंचं ट्विट सोशल मीडियावर पसरू लागला. विद्यापीठ प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ दखल घेत तावडेंचं अकाऊंट हॅक करण्यात आलं असून परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं म्हटलं.

यानंतर विनोद तावडे यांनीही, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नसावा यासाठी चुकीची माहिती देणाऱ्या ट्विटचा स्क्रिनशॉट टाकत, परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सांगितलं.

घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासन तक्रार दाखल करणार आहे की नाही हे मात्र कळू शकलेलं नाहीये.