मुंबई: बनावट ‘यूपीआय’ पैसे जमा झाल्याचे संदेश आणि खोटे स्क्रीनशॉट दाखवून कपड्यांच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना खार पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून विविध प्रकारचे २४० कपडे आणि फसवणुकीसाठी वापरलेले मोबाइल जप्त करण्यात आले. मुंबईतील विविध कपड्यांच्या दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन, पैसे भरल्याचा आभास निर्माण करीत वस्तू घेऊन पसार होण्याचा प्रकार हे तिघे करत होते.
समीर परहान (३०), मोहसिन शेख (१९) आणि कैफ सहा २४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे नाशिकचे रहिवासी असलेले हे तिघे कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन कपडे निवडत असत. त्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने दुकानदाराचा मोबाइल क्रमांक घेत आणि संबंधित रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे दर्शविणारा बनावट संदेश पाठवत. काही वेळा पैसे जमा झाल्याचा खोटा स्क्रीनशॉटही दाखविण्यात येत असे. पैसे मिळाल्याची खात्री न करता दुकानदाराने कपडे दिल्यानंतर आरोपी ते घेऊन निघून जात होते.
या प्रकारातील पहिली तक्रार ११ सप्टेंबर रोजी खार पश्चिम येथील शुभ्रा अपार्टमेंट्समधील दुकान क्रमांक दोनचे मालक राजेश नरसी पटेल यांनी दिली. आरोपींनी पैसे जमा झाल्याचा बनावट संदेश दाखवून कपडे नेल्याचे त्यांच्या तक्रारीत नमूद होते. प्रत्यक्षात बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. नाशिक येथील कुरेशी नगर परिसरात कारवाई करून पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून शर्ट, पँट, स्वेटर, जीन्स आणि ट्रॅक पँट यांसह एकूण २४० कपडे जप्त करण्यात आले. बनावट पैसे जमा झाल्याचे संदेश पाठविण्यासाठी वापरलेले मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केले.
ऑनलाइन व्यवहारात सर्तकता बाळगण्याचे आवाहन
या तिघांचा मुंबईतील वडाळा आणि आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या चोरी व फसवणुकीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. नाशिकमधील काही पोलीस ठाण्यांमध्येही अशा स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यामुळे या कथित टोळीने आणखी किती दुकानदारांची फसवणूक केली, तसेच जप्त केलेला माल कोणत्या दुकानांमधून मिळविण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, ऑनलाइन व्यवहार स्वीकारताना केवळ मोबाइलवरील संदेश किंवा स्क्रीनशॉटवर विश्वास न ठेवता संबंधित रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
