मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेतील सहकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी मतदारयादीत बोगस नावे घुसडल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी केला. ही नावे वगळल्यावर निवडणुकीसाठी आम्ही तयार असून युवासेनेला चारी मुंडय़ा चीत करू, असे आव्हान त्यांनी दिले.
माजी आमदार अतुल शहा यांनी चांद्रयान मोहीमेसंदर्भात इस्रोतील संशोधक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करणारी दोन गाणी शेलार यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात प्रसारित करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, मी आणि अभाविपने राज्यपालांकडे बोगस मतदारयादीबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर मतदारयादीतून ४६९ बोगस नावे वगळण्यात आली असून आम्ही अजून ७५५ नावांची यादी दिली आहे, तर २८६ नावे दुबार आली आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी युवासेनेने खोटी कागदपत्रे सादर करून मतदारयादीत बोगस नावे घुसडली आहेत.