मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मात्र शेतकरी संपाचा तिढा कायम

कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑक्टोबपर्यंत होणारच, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, पण त्यांच्या आड राहून राजकारण करणाऱ्यांशी चर्चा करणार नाही, असे स्पष्ट केले. शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने संपाचा तिढा सहाव्या दिवशीही कायम आहे.

कर्जमाफी जाहीर करूनही आंदोलने सुरूच असून २८ शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक गुरुवारी नाशिकला होणार आहे. त्या वेळी आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी संघटनेच्या मोजक्याच नेत्यांना हाताशी धरून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे अन्य संघटना बिथरल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शविली आहे. मात्र ज्यांना प्रश्न सोडवायचा आहे, त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला माझी तयारी आहे, असे फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. शेतकऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षांची राजवट पाहिली आहे. भाजप सरकारने गेल्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांसाठी जे काही केले, ते शेतकऱ्यांना माहीत आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास वाटत आहे.

शेतकरी संपामुळे अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर पट्टय़ात काही ठिकाणी आंदोलने व शेतीमालाच्या गाडय़ा अडविण्याचे प्रकार मंगळवारीही झाले. बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाला, फळांचे दर गेल्या काही दिवसांत अनेक पटींनी वाढले आहेत.

कर्जमाफीच्या निर्णयाची चार महिन्यांत अंमलबजावणी केली जाईल आणि त्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. आधीच्या कर्जमाफीच्या वेळी जे गैरप्रकार झाले, ते आता होऊ दिले जाणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री