मराठवाडा आणि दिर्भातील अनेक जिल्ह्य़ात सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. या फसवणुकीची सरकारने दखल घेऊन दुबार पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.  बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो  असा इशारा किसान सभेने दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. तरीही  खबरदारी न घेतल्याने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे अनेक ठिकाणी वितरण झाले असून पेरा वाया जाण्याची परिस्थती निर्माण झाली आहे. मराठवाडा-विदर्भात परभणी, बुलढाणा, नांदगाव खांडेश्वर आदी भागात बनावट सोयाबीन बियाणे वाटप झाल्याचे समोर आले असून अन्य भागातूनही पेरा वाया गेल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिली.