मुंबई : तुमच्याकडे बहुमत आहे, असे तुमचे मत आहे, तर मग मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही, विधिमंडळाचे अधिवशन का घेतले जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सोमवारी टीकेचे लक्ष्य केले. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे, त्यांना भरीव मदत करून दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच सरकार आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, असे म्हणता मग मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कुणी अडविले आहे काय, असा सवाल त्यांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही हा खरे तर राज्यातील तेरा कोटी जनतेचा अपमान आहे. आज शेतकरी त्रासून गेला आहे. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत ही या सरकारच्या दृष्टीने शरमेची बाब आहे अशा शब्दात पवार यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढविला.

, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. पालकमंत्री बैठका घेऊन सरकारी यंत्रणा कार्यरत करतात, वेळोवळी परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्तीग्रस्त शेतकरी, सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम करतात. परंतु मंत्रिमंडळ विस्तार नाही, त्यामुळे पालकमंत्री नाहीत, सरकारकडून मदत नसल्याने जनता हवालदिल आहे. शिंदे सरकारने आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करावा, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घ्यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.

हवामान खात्यावर टीका

हवामान खात्याचे अंदाज आजकाल चुकायला लागले आहेत. रेड अलर्ट देतात आणि पाऊसच पडत नाही, मात्र शाळांना सुट्टी जाहीर होते. हवामान खात्याने जाहीर केले की पाऊस पडतच नाही, असे अजितदादा हवामन खात्यावरही कडाडले. हवामान खात्यावर केंद्र सरकारने व राज्याने हवा तो खर्च करावा आणि सुधारणा करावी, असे सांगतानाच त्यांनी लंडनमध्ये हवामान खात्याचे अंदाज कसे तंतोतंत खरे ठरतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.