मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, आपण एकत्र असताना मंजूर केलेल्या कामाला स्थगिती दिली आहेत. मुख्यमंत्री महोदय, हे वागणे बरे नव्हे. कधी आपल्यालाही एकत्र यायला लागू शकते, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीवरील चर्चेदरम्यान अजित पवार यांनी आघाडी सरकाच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे- फ़डणवीस सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे थांबवत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची कामे मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आपण सत्तेत एकत्र असताना मंजूर केलेल्या कामांना काहीही कारण नसताना स्थगिती दिलीत, हे वागणे बरे नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्यालाही एकत्र यायला लागू शकते हे लक्षात ठेवा अशा शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. एवढेच नव्हे तर अतिवृष्टी सगळीकडेच झाली आहे. सगळीकडेच सारखे नुकसान झाले आहे आहे. अशावेळी केवळ भाजप आणि शिंदे गटाच्याच मतदार संघांना मदत देण्याचे धोरम्ण घेता येणार नाही. तर रस्ते, जिल्हा मार्ग याबाबत लवचीक धोरम्ण स्वीकारून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांसाठी मदतीचे समान धोरम्ण राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

काळय़ा- पांढऱ्या दाढीचा प्रभाव

राज्यात सध्या काळय़ा, तर देशात पांढऱ्या दाढीचा प्रभाव आहे. देशात आर्थिक मंदी नाही असे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. मग जीएसटीच्या माध्यमातून सातत्याने भाववाढ का केली जात आहे. दैनंदिन जीवनातील वस्तूंवरही वस्तू आणि सेवाकर लावला जात आहे. मंदी नाही तर मग सातत्याने सर्वच बाबींवर वस्तू आणि सेवाकर वाढ का, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. आता केवळ भाषणावरच जीएसटी लावणे केंद्राने बाकी ठेवले आहे असा टोला मारत, देशाचे एवढेच काय जगातील अनेक देशांचे सध्या तुमच्यावर लक्ष आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी जीएसटी कमी करा अशी मागणीही भूजबळ यांनी केली.

१३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शिंदे- फडणवीस सरकार  आल्यापासून ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार तर बागायतींसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

शेतकरी ओक्केमध्ये नाहीत : चव्हाण

‘झाडी, डोंगार, हॉटेल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत’, अशा शब्दांत राज्यातील सत्तांतर नाटय़ावर काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी चिमटा काढला

बच्चू कडू यांचा घरचा आहेर

चर्चेत भाग घेताना प्रहार संघटनेचे आमदार व ठाकरे सरकारमधील माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. मी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला हे महत्त्वाचे नाही तर शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचे आहे. माझ्या पक्षाचे सरकार असल्यावर लोकांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही हा काय प्रकार. मते शेतकऱ्यांची आणि गुलामी नेत्यांची हे चालणार नाही, अशा शब्दांत कडू यांनी संताप व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers suicide shinde government ajit pawar charge declare wet drought ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST