आतापर्यंत फक्त चित्रपट, पुस्तके आणि संगणकीय खेळांपर्यंत मर्यादित असलेल्या पायरसीने आता फॅशन जगतालाही विळखा घातला आहे. फॅशनला नाके मुरडणारा समाज आता उलट या विषयाबाबत सजग झाला असताना पायरसीने शिरकाव केल्याने नामांकित डिझायनर हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे इंटरनेटच्या वापराने अद्ययावत फॅशनची पायरसीही अगदी बिनबोभाट होत असून ४०-५० हजारांची डिझायनर साडी आता चार-पाच हजारांत उपलब्ध होत आहे.
चित्रपट तारकांची फॅशन आपल्यासाठी नाही, अशी धारणा असलेला मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग गेल्या पाच वर्षांत फॅशनकडे वळला. याच काळात फॅशन डिझायनर्सनी किरकोळ बाजारपेठेत प्रवेश केला आणि डिझायनर कपडे आणि दागिन्यांची भुरळ तरुणाईला पाडली. गेल्या दोन वर्षांत अनिता डोंगरे, मसाबा गुप्ता, करोल दत्ता अशा आघाडीच्या डिझायनर्सच्या प्रिंट्सची नक्कल बाजारात आली. बडय़ा दुकानांत पाच हजारापर्यंत मिळणाऱ्या कपडय़ांची नक्कल रस्त्यावर २५० ते ५०० रुपयात उपलब्ध आहे.

सुरुवातीला आम्ही डिझाइन केलेल्या कपडय़ांच्या नकला होतात, याचा अभिमान वाटे. या कारणाने का होईना आपल्या कामाची दखल घेतली जाते, ही बाब सुखावून जात होती. मात्र, आता तीच गोष्ट आमच्यासाठी डोकेदुखी बनली आहे. पण, देशात फॅशनला कलेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत पायरसीपासून सुटका नाही.
श्रुती संचेती     फॅशन डिझायनर

पायरसी कोणाची?
अनिता डोंगरे, मसाबा गुप्ता, करोल दत्ता, मनीष मल्होत्रा, सब्यासाची, नीता लुल्ला, विक्रम फडणीस, रोहित बाल या नामांकित फॅशन डिझायनर्सच्या कपडय़ांबाबत मोठय़ा प्रमाणावर पायरसी होत असल्याचे दिसून येते.