मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आपल्या अखत्यारितील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी पथकर वसुलीसाठी अत्याधुनिक अशी फास्टॅग वार्षिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेला देशभरातील वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ १३ महिन्यांत देशभरातील पासधारकांची संख्या एक कोटींवर पोहोचली आहे. या वार्षिक पासमुळे पथकर भरणे सोपे झाल्याने वाहनचालकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.
देशभरातील अनेक द्रुतगती महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर भरावा लागतो. पथकर भरण्यासाठी पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यात रोख रक्कम घेऊन पथकर वसुली करण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. याचा त्रास वाहनचालकांना होतोच, पण त्यामुळे पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होते. पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच पथकर वसुलीसाठी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅगची अत्याधुनिक पद्धती आणली.
त्यानंतर वाहनचालक-मालकांच्या सुविधेसाठी फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली. एनएचएआयच्या संकेतस्थळावर आणि ॲपवर १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध झाला.
पासद्वारे ३०७५ रुपयांत २०० फेऱ्या
– केंद्र सरकारच्या या वार्षिक पास सुविधेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा, अर्थात ऑगस्ट २०२६ मध्ये वार्षिक पासधारकांची संख्या ८६ हजार होती. आता केवळ १३ महिन्यांत एकूण फास्टॅग वार्षिक पासधारकांची संख्या एक कोटींवर पोहोचली आहे.
– या पासद्वारे ३०७५ रुपयांत २०० फेऱ्या करता येत असल्याने या पासला प्रतिसाद मिळत आहे. पथकर भरण्याच्या कटकटीतून वाहनचालकांची सुटका झाली. दरम्यान, चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच हा पास लागू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही.
– राष्ट्रीय महामार्गांवरील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा फायद्याची ठरत आहे. या सुविधेमुळे पथकर नाक्यांवर होणाऱ्या वादांमध्ये मोठी घट झाली आहे. ही सुविधा फायद्याची ठरत असल्याने वाहनचालक-मालक वार्षिक पासकडे वळत आहेत. एका वर्षात या सुविधेला चांगली पसंती मिळत आहे.
