मुंबई...द्रुतगती महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासह वाहनांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग वार्षिक पास सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू केली आहे.

या सुविधेला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता वार्षिक पासच्या दरात एनएचएआयने २.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ३००० रुपयांमध्ये मिळणारा फास्टॅग वार्षिक पास आता १ एप्रिलपासून ३०७५ रुपयांमध्ये मिळणार आहे. त्याचा फटका देशभरातील ५० लाखांहून अधिक पासधारकांना बसणार आहे.

पथकर वसूली अतिजलद, पारदर्शक आणि संगणकीय पद्धतीने व्हावी यासाठी एनएचएआयने फास्टॅग प्रणाली लागू केली. या प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून पथकर भरणे सोपे झाले आहे. त्यापुढे जात एनएचएआयने गेल्या वर्षी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली. एनएचएआयच्या देशभरातील द्रुतगती महामार्गांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि वाहनांचा प्रवास अतिजलद करण्यासाठी ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली.

या वार्षिक पासद्वारे ३००० रुपयांत एनएचएआयच्या महामार्गावरील कोणत्याही पथकर नाक्यांवरून २०० वेळा प्रवास करता येत आहे. पासची वैधता एका वर्षासाठी असली तरी २०० वेळा प्रवास झाल्यास पासची वैधता संपुष्टात येते. असा हा पास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने या सुविधेला वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आजच्या घडीला देशभरातील ५० लाखांहून अधिक वाहनधारक फास्टॅग वार्षिक पासचा वापर करतात. मात्र आता त्यांच्या खिशाला काहीशी कात्री बसणार आहे. कारण आता वार्षिक पास महागणार आहे.

फास्टॅग वार्षिक पासच्या दरात १ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला आहे. या निर्णयानुसार २.५ टक्क्यांनी पासदर वाढणार असल्याची माहिती एनएचएआयच्या नागपूरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. ३००० रुपये असा असणारा पासचा दर १ एप्रिलपासून ३०७५ रुपये असा होणार आहे. याचा फटका ५० लाखांहून अधिक पासधारकांना बसणार असून या राज्यातील पासधारकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. दरम्यान एप्रिल २०२६ ते एप्रिल २०२७ पर्यंत फास्टॅग वार्षिक पाससाठी नवीन दर लागू असतील.

तर पास दराचे दरवर्षी एनएचएआयकडून पुनरावलोकन करून दरात सुधारणा केली जाणआर आहे. त्यामुळे वार्षिक पासच्या दरात पुढे दरवर्षी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.