मालाड येथील एका जैन मंदिराच्या विश्वस्तांनी एका जैन मुनींच्या वडिलांवर अपहरणाचा आरोप केला आहे. पद्मविजय असे त्या मुनींचे नाव असून जिग्नेश मेहता असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. २७ वर्षीय पद्मविजयने वडिलांच्या विरोधात जाऊन संन्यास घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी पद्मविजयला जबरदस्ती घरी नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी वडिलांसह तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- बंडखोर आमदारांना परत बोलवणारे संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी, म्हणाले…

वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन घेतला संन्यास

जिग्नेश मेहता यांचा व्यवसाय आहे. आपला मुलगा पद्मविजयने आपला व्यवासायत हातभार लावावा, अशी जिग्नेश यांची इच्छा होती. मात्र, इंजिनिअरींग केलेल्या पद्मविजयनला वडिलांच्या व्यवसायात काहीच रस नव्हता. अखेर त्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. जिग्नेश मेहतांनी या निर्णयाला खूप विरोध केला. मात्र, वडिलांच्या विरोधाला झुगारुन पद्मविजयने मालाड येथील एका जैन मंदिरात संन्यास घेतला.

वडिलांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न

अखेर जिग्नेश तीन लोकांसोबत त्या मंदिरात गेले आणि जबरदस्ती पद्मविजयन महाराजांना घरी नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, पद्मविजयन महाराजांच्या वडिलांनी माझा फोन काढून घेतला आणि मला खाली ढकलले, असा आरोप सुरक्षारक्षकांनी केला आहे. या ओढाओढीत पद्मविजय महाराजांना इजा झाली असून, उपचारासाठी त्याला भिवंडी रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- 20 लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; 6 तासात आरोपींना केलं जेरबंद; अपहरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग

वडिलांसह तीन जणांवर गुन्हा दाखल

दिंडोशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिग्नेश मेहता यांच्यावर अपहरण आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.