दर दिवशीच बिघाडाची सवय लागलेल्या मध्य रेल्वेचा मंगळवारही बिघाडासहच सफळ संपूर्ण झाला. मंगळवारी संध्याकाळी दादर स्थानकाजवळ रेल्वेरूळांत बिघाड झाल्याने डाउन जलद मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली.
दादरला प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाडय़ा या बिघाडामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जात होत्या. तसेच डाउन जलद उपनगरीय गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. परिणामी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दर मंगळवारी मध्य रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांची ‘वक्तशीरपणाबद्दलची बैठक’ महाव्यवस्थापकांच्या दालनात घेतली जाते. या बैठकीत आठवडाभरात झालेल्या बिघाडांबाबत, दिरंगाईबाबत चौकशी होते. मात्र या बैठकीतून काहीच ठोस निष्पन्न होत नसल्याचे समोर येत आहे. बैठकीनंतर काहीच तासांत प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरील रुळांच्या एका पॉइंटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे गाडय़ांचा खोळंबा झाला.