राज्यातील जनमत हे काँग्रेसच्या बाजूने असल्याचे सांगली महापालिका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपला लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार करण्याकरिता कोटय़वधी रुपये खर्च केले जात असून, एका परदेशस्थ उद्योगपतीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उद्योगपतीला मोदी मदत करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.
आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असताना गुजरातकडून खोटानाटा प्रचार करून गुजरातच सर्व क्षेत्रांमध्ये कसे आघाडीवर हे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात आम्हीच पहिल्या क्रमांकाचे हा प्रचार काही पक्षांनी सुरू केला असला तरी सांगली महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला साडेचार हजार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त ७५० मते मिळाली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.