मुंबई : करोनासह श्वसनसंस्थेशी निगडित आजार बरे करण्याची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या औषध उत्पादक कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने  कारवाई केली.

औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ अंतर्गत औषधांबाबत आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत शंभरहून अधिक आक्षेपार्ह जाहिराती प्रशासनाने शोधल्या असून संबंधितांना नोटीसदेखील पाठविली होती. यातील काहींवर आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे.

नाशिकच्या ‘नॅचरल सोल्यूशन्स’ या कंपनीचे व्हिरुलिना पावडर हे आयुर्वेदिक औषध बाजारात आहे. या औषधामुळे करोनासह श्वसनसंस्थेचे आजार बरे होत असल्याचा मजकूर औषधाच्या लेबलवर असल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावर आढळले. श्वसनसंस्थेच्या आजारावर प्रभावी असल्याची जाहिरात करणे कायद्याच्या नियमांचे उल्लंघन असल्यामुळे प्रशासनाने या कंपनीचे मालक अनिलकुमार शर्मा आणि युगंधर फार्माचे योगिता केळकर यांच्याविरोधात औषध निरीक्षक ध. अ. जाधव यांनी शिवडी न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

कोणत्याही भ्रामक जाहिरातीस बळी पडू नये आणि नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मासिक पाळीबाबत आक्षेपार्ह जाहिराती

‘बंद झालेली मासिक पाळी नियमित करते’ असा मजकूर गायनोप्लस कॅप्सूल या औषधावर छापल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. अशी जाहिरात करणे बेकायदा असल्यामुळे या औषध कंपन्यांविरोधात प्रशासनाने दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी इंदौरच्या नेल्को बायोटेक कंपनीचे मालक दिलीप बुऱ्हानी यांना दोन्ही खटल्यांमध्ये ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंदूरच्या क्रिस्टल हेल्थकेअर कंपनीचे मालक गौरव शहा आणि लाईड फार्मासिटिक्युल्सचे संचालक देवेंद्र खत्री यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा केली आहे.

तक्रारीसाठी..

औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती कायदा)  १९५४ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास  १८०० २२२ ६८३१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.